तर उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही हा पक्ष सोडणार महाआघाडीची साथ ?

congress ncp

मुंबई: केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येत महाआघाडीची स्थापना करण्याच्या हालचाली चालवल्या आहेत. मात्र देशात लोकसभेच्या सर्वाधिक जागा असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी आणि बहुजन समाज पक्षाने आपली वेगळी चूल मांडली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात देखील सपाला लोकसभेची एक जागा न मिळाल्यास महाआघाडीची साथ सोडण्याचा इशारा समाजवादी पक्षाच्या नेत्यांकडून देण्यात आला आहे.

कॉंग्रेस – राष्ट्रवादीकडून राज्यामध्ये महाआघाडी उभारण्यासाठी चर्चेच्या फैरी सुरु आहेत. राज्य तसेच केंद्र स्तरावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बोलणी सुरु आहेत. मात्र, दोन्ही कॉंग्रेस इतर छोट्या पक्षांसाठी जागा सोडण्यासाठी जास्त उत्सुक नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे या पक्षांमध्ये नाराजीचा सुरु दिसून येत आहे.

दोन्ही कॉंग्रेसमध्ये जागा वाटप झाले तरी इतर छोट्या पक्षांना काही जागा सोडाव्या लागणार आहेत, यामध्ये समाजवादी पक्ष हा राष्ट्रवादीसोबत तर भारिप बहुजन पक्ष हा कॉंग्रेससोबत राहू शकतो. त्यामुळे त्यांना जागा सोडणे गरजेचं असणार आहे. दरम्यान, भारिपने आधीच आपली वेगळी चूल मांडली असली, तरी त्यांना सोबत घेण्याच्या कॉंग्रेसच्या आशा आणखीन कायम आहेत.

दुसरीकडे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी बुधवारी मुंबईत राज्य कार्यकारिणीची बैठक घेतली. महाआघाडीने समाजवादीला लोकसभेची एक जागा द्यावी. यासंदर्भात लवकर निर्णय झाला नाही, तर तर आपला पक्ष मुंबईसह उर्वरित ठिकाणी दहा जागा लढेल, असे आझमी यांनी सांगितले.