fbpx

सोलापूर लोकसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा

टीम महाराष्ट्र देशा : सोलापूर लोकसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प्रकाश आंबेडकर यांना संपूर्ण व सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पक्षाच्या पॉलिटब्यूरोच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांनी आजवर एकत्रितपणे सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवर अनेक संयुक्त आंदोलने आणि मोहिमा केल्या आहेत. महाराष्ट्रातील जमिनीचा प्रश्न, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि मागास विभागांवर होणारे अन्याय-अत्याचार, उना, सहारनपूर आणि देशभरात इतरत्र आर.एस.एस.-भाजपच्या गुंडांनी दलित आणि अल्पसंख्याकांवर केलेले अमानुष अत्याचार, हैद्राबाद येथील दलित विद्यार्थी रोहित वेमुला याची संस्थात्मक हत्त्या या प्रश्नांवर आम्ही संयुक्तपणे प्रखर आंदोलने केलेली आहेत.

विशेषतः भीमा कोरेगाव प्रकरणी दलित जनतेवर जो अमानुष अत्याचार करण्यात आला त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारून तो आम्ही संयुक्तपणे यशस्वी केला. या आंदोलनात हजारो दलित तरुणांची धरपकड करून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले, आणि उलट या हल्ल्याचे सूत्रधार मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना मोकळे आणि मोकाट सोडण्यात आले, त्यावरही आम्ही संयुक्तपणे भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात लढा उभा केला. त्याच प्रश्नी डॉ. आनंद तेलतुंबडे आणि इतरांवर जो दडपशाहीचा वरवंटा हे सरकार फिरवत आहे, त्याचाही आम्ही प्रखर विरोध केला आहे.

मुंबईतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेले आंबेडकर भवन ही इमारत पाडण्याच्या भाजप-शिवसेना राज्य सरकारच्या कटकारस्थानाविरुद्ध माकप प्रकाश आंबेडकरांच्या साथीने रस्त्यावर उतरला होता. त्या प्रश्नावरील मुंबईतील विराट मोर्चास माकपचे सरचिटणीस खासदार कॉ. सीताराम येचुरी यांनी संबोधित केले होते. त्यांनी हा प्रश्न त्याच दिवशी सकाळी राज्यसभेत हिरीरीने मांडला होता. या पार्श्वभूमीवर आणि प्रकाश आंबेडकर हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत हे ध्यानात घेऊन पक्षाने त्यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भरघोस मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सक्रिय भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पक्षाच्या केंद्रीय समितीच्या धोरणानुसार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जागा लढवत असून त्याला विजयाची खात्री आहे. येथे आमचे प्रभावशाली उमेदवार पक्षाचे केंद्रीय कमिटी सदस्य, अखिल भारतीय किसान सभेचे माजी राज्य अध्यक्ष, दोन्ही ऐतिहासिक किसान लॉंग मार्चचे प्रणेते आणि महाराष्ट्र विधानसभेवर सात वेळा निवडून आलेले विद्यमान आमदार कॉ. जे. पी. गावीत हे आहेत.

राज्यात इतरत्र भाजप-शिवसेना आघाडीचा पराभव करण्याच्या उद्देशाने त्यांच्या विरोधातील जास्तीत जास्त मते एकत्रित करण्यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे. त्या प्रत्येक मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करू शकेल अशा प्रबळ उमेदवाराला जनतेने निवडून द्यावे, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.

वंचित बहुजन आघाडीचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा भाग नाही आणि तिच्या काही घटक पक्षांशी व तिच्या एकूण धोरणाशी तो सहमत नाही. परंतु वरील कारणांसाठी माकप सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करील. अकोला लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील एक-दोनच अशा मतदारसंघापैकी आहे की जेथे पक्षाची एकही शाखा नाही.