fbpx

कोणत्याही शाही विवाहाला मागे टाकणारा महाराष्ट्रातील सामुदायिक विवाहसोहळा

उस्मानाबाद : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या कन्येचा विवाहसोहळा सध्या देशासह जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. अंबानींच्या घरातील सोहळा असल्याने झालेला खर्च हा शेकडो कोटीमध्ये आहे. एवढ्या पैशात आपल्या राज्यातील एक शासकीय योजना पूर्ण होईल. असो शेवटी वैयक्तिक कार्यक्रम कोणी कसा करावा हा ज्याचा-त्याचा अधिकार आहे. परंतु प्रत्येकालाच आपल्या मुला-मुलीचा विवाह आशा शाही थाटात करणे शक्य होत नाही.

आपल्याकडे विवाह सोहळा म्हंटल की आकर्षक सजावट असणारा भव्य मंडप, बँडबाजा, घोडा, हजारो वऱ्हाडी असे चित्र आपल्यापुढे उभे राहते. प्रत्येकाला आपल्या मुला- मुलीचा विवाह मोठ्या थाटात करण्याची इच्छा असते परंतु सर्वांनाच हे शक्य होत नाही. याला कारण कधी दुष्काळ तर कधी गरीबी बनते. साधे लग्न म्हणलं तरी आज खर्चाचे आकडे लाखांत जातात. मात्र या सर्व गोष्टीना फाटा देत आपल्या भागातील प्रत्येक लेकीचं लग्न थाटामाटात करण्याचे व्रत घेत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून 2006 मध्ये सामुदायिक विवाहसोहळा आयोजित करण्यास सुरुवात केली.

स्वतः बिकट परिस्थितीमध्ये कुकुट पालन केंद्रात साधी नौकरी केलेल्या सुभाष देशमुख यांनी स्थापन केलेल्या लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून मागील 14 वर्षांपासून सामाजिक बांधिलकीचे व्रत जपले आहे. मागील 13 वर्षांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 31 सोहळ्यात 2515 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. सामुदायिक विवाहसोहळा असला तरी कोणत्याही शाही विवाहाला तो मागे पाडणारच ठरतो.

पारंपरिक प्रथेप्रमाणे सोहळ्यात वधू-वरांना विवाहाचे कपडे, हळदीच्या कपड्यांसह ताट-वाटी, वधूंसाठी मणी-मंगळसूत्र व जोडवे-बिचवे,तसेच संसारोपयोगी साहित्य बालकृष्णाची मूर्ती दिली जाते.

आपल्याकडे केवळ नवरदेवाची वरात काढण्याची प्रथा आहे, मात्र देशमुख यांनी वधूला देखील मानाचे स्थान देत वधूवरांची संपूर्ण शहरातून वरात काढण्याची प्रथा सुरू केली.साग्रसंगीत पार पडणाऱ्या सोहळ्यामध्ये लाखो वऱ्हाडींसाठी पंचपक्वांन भोजन दिले.

विवाह बंधनात अडकणाऱ्या नववधूवारांना सामाजिक बांधिलकीचे व्रत देण्यासाठी सोहळ्यातच समुपदेशन आणि रक्तदानाचे आयोजन केले जाते. येत्या 30 डिसेंबर रोजी दुष्काळाशी सामना करत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यासाठी लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने सामुदायिक विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जवळपास 150 जोडपी विवाहबद्ध होतील.