अपराजित संघर्षयोद्धा… लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब

महाराष्ट्र देशा स्पेशल: जिल्हा परिषद सदस्य ते उपमुख्यमंत्री, खासदार अन केन्द्रीय मंत्री, एका गरीब कुटुंबात जन्मलेला मुलगा ते महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेला लोकनेता ! हा प्रवास आहे गोपीनाथ पांडुरंग मुंडे नावाच्या संहर्षमय झंजावाताचा.

१२ डिसेंबर १९४९ नाथ्रा या गावात गरीब शेतकरी कुटुंबात गोपीनाथ मुंडे यांचा जन्म झाला. परळी तालुक्यातील हे दुष्काळी गाव. याच गावाने दिला गोपीनाथ मुंडे नावाचा एक रणझुंजार लढवैय्या लोकनेता. वडील पांडुरंगराव आणि आई लिंबाबाई यांनी परिस्थितीशी संघर्ष करत मुलांना जिद्दीने शिकवले. वडिलांचे १९६९ मध्ये निधन झाले. लहानग्या गोपीनाथाचा संघर्ष सुरु झाला तो इथूनच. याच संघर्षातून त्यांच्यातला लोकनेता घडवला. सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे, वंचित घटकांचे दुःख दूर करण्याची प्रेरणा गोपीनाथ मुंडेंना दिली ती याच संघर्षमय दिवसांनी. जेमतेम पाच हजार घरांचे नाथ्रा गाव. इथल्याच एका झाडाखाली जिल्हा परिषदेच्या शाळेत गोपीनाथ मुंडे शिकले. परीक्षा देण्यासाठी १२ कि.मी चालत जावं लागायचं असे ते दिवस गोपीनाथ मुंडेंना नेहमी आठवत असत. पुढच्या शिक्षणासाठी लहानगा गोपीनाथ परळीच्या जिल्हा परिषद शाळेत जाऊ लागला. इथे त्यांचे अनुभव विश्व अधिक विस्तारलं. परळीच्या आर्य समाज मंदिरात ते नेहमी जात. इथेच विविध धर्मांचा त्यांनी अभ्यास केला. पुस्तकं आणि वर्तमान पत्रांची गोडी लागली तीही परळीतच.

मग मुंडे कॉलेज शिक्षणासाठी अंबाजोगाईत दाखल झाले. इथे खऱ्या अर्थाने गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाचा जन्म झाला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले गोपीनाथ मुंडे विद्यार्थी चळवळीत सक्रिय झाले. विद्यार्थ्याच्या मागणीसाठी त्यांनी आंदोलने केली. कॉलेज निवडणुकी मध्येही त्यांनी भाग घेतला पण निवडणूक मात्र लढवली नाही.

अंबाजोगाई मधल्याच कॉलेज दिवसात त्यांची भेट झाली प्रमोद महाजन नावाच्या एका उमद्या तरुणाशी. ही साद पुढे नात्यातही बदलली आणि बहरलीही. त्यावेळी प्रमोद महाजन अभाविप चे तालुका सचिव होते. हा काळ होता १९७० चा. प्रमोद महाजन यांच्या आग्रहावरून गोपीनाथ मुंडे नावाचा तरुण संघ परिवारामध्ये मध्ये दाखल झाला. विद्यार्थ्याची आंदोलने, ग्रामीण भागातील मुलांसाठी संघर्ष, ज्ञान-शील-एकतेची शिस्त आणि नेतृत्व गुणांची पायाभरणी झाली ती इथेच.

गोपीनाथ मुंडे नावाचा नेता आकाराला येत होता. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदार संघात जनसंघाच्या उमेदवारासाठी गोपीनाथ मुंडे प्रचारात उतरले. हि त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात होती. गोपीनाथ मुंडे नावाचा हा कार्यकर्त्यांचे जाळे विणणारा नेता पक्ष नेतृत्वाने अचूक हेरला होता.

नंतर गोपीनाथ मुंडेंनी पुण्याच्या आय.एल.एस या विधीमहाविद्यालयात प्रवेश घेतला. बीड नंतर पुण्यानं गोपीनाथ मुंडेंच्या जडणघडणीत मोठा हातभार लावला. एका ग्रामीण भागातील तरुणाला पुण्यानं नेतृत्वगुण दिले. पुण्यातच त्यांची भेट झाली विलासराव देशमुख या लातूर जिल्ह्यातल्या बाभळगावच्या च्या तरुणाशी. पुढे राजकीय वाटा वेगळ्या झाल्या. पण विलासरावांशी कॉलेजमधे जुळलेली मैत्री गोपीनाथ मुंडेंनी आयुष्यभर जपली. याच काळात कायद्याचे शिक्षण घेत असताना पुण्यात संघाच्या कामात मुंडेंचा सहभाग वाढत गेला. पुण्यातील मोतीबाग येथील मुख्यालयातही मुंडे वर्षभर राहिले. समर्थ शाखेचे मुख्य शिक्षक आणि चाणक्य शाखेचे कार्यवाह आणि संभाजीनगर मंडळ कार्यवाह अशी बढती मुंडेंना मिळत गेली. यावेळीच अटलबिहारी वाजपेयी, श्रीपती शास्त्री यांच्या विचारांचा प्रभाव गोपीनाथ मुंडेंवर पडला. पुण्यातील महाविद्यालयातील तरुणांचे नेतृत्वही मुंडेंकडे आले.

याच काळात गोपीनाथ मुंडेंना एका नव्या वादळाने झपाटून टाकले होते. १९७४ ला जयप्रकाश नारायण यांच्या नवनिर्माण आंदोलनाने देश पेटून उठला होता. जे.पींनी भ्रश्टाचारा विरोधात संपूर्ण क्रान्तीची देशव्याही मोहीम हाती घेतली होती. गोपीनाथ मुंडे या लढवैय्या तरुणाने जेपींची हाक ऐकली नसती तर नवलच होते. संपूर्ण क्रांती’ ची गर्जना करणा-या जयप्रकाश नारायणांच्या परिवर्तणाचं वादळ सत्तरच्या दशकात पुण्यात आलं होतं. S.P कालेज वर त्यांची सभा होती. पुण्यातील कालेजच्या विद्यार्थ्यांनी ठरवलं की, जयप्रकाशजींना आपणही मानपत्र द्यायचं, पण ज्येष्ठांचा या कल्पनेला विरोध होता. मग त्या विद्यार्थ्यांच्या लिडरने एक शक्कल लढविली… जे.पी शिवाजी नगर रेल्वे स्टेशनवर उतरताच त्यांना विद्यार्थ्यांनी अडवलं. जयजयकाराच्या जल्लोषात स्वागत करत त्यांना मानपत्र बहालही करुन टाकलं! उत्साही तरुणांच्या त्या लिडरचं नाव होतं, गोपीनाथ मुंडे! बीडमधील परळी तालुक्यातील नाथरासारख्या अत्यंत आडबाजूच्या गावातून पुण्यात शिकायला आलेल्या मुंडेंना नेता म्हणून ख-या अर्थाने घडवले ते पुण्यानं. १९७१ ते १९७५ ही त्यांनी पुण्यात विद्यार्थी म्हणून व्यतित केलेली वर्षे पुण्याच्या आणि त्यांच्या मित्रांच्या स्मृतीतून न जाणारी आहेत. ही वर्षं या दोघांच्याही मनाच्या कुपीत ‘मंतरलेला काळ’ बनून राहतील.

खरं तर ते दशकच अस्वस्थ होतं. देशातील तरुणाईनं व्यवस्था परिवर्तणाचा, नवनिर्माणाचा ध्यास घेतला होता. जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखाली वणवा भडकला. तो पुण्यातही धडाडला. त्याचं नेतृत्व केलं, ला कालेज मधे शिकणा-या मुंडेंनी. तेव्हा आख्खा महाराष्ट्र वकील होण्यासाठी पुण्यात आयएलएस ला कॉलेजमध्ये यायचा. म्हणजे राज्यातील सर्व भागातील विद्यार्थी या कालेजात कायद्याचं शिक्षण घ्यायला यायचे. शुल्कवाढीचा प्रश्न असो, विद्यापीठातील गैरकारभार असो की, परिक्षेच्या टाईम टेबल मधील घोळ. सर्व विद्यार्थी आपलं गा-हाणं घेऊन आयएलएसच्या होस्टेलवर मुंडेंभोवती जमायचे. मुंडे हे सगळं अंगावर घ्यायचे. विद्यार्थ्यांसाठी कोणासोबतही लढायला तयार व्हायचे. हिप्पी राखून, बेलबाटम आणि गागल घालून, लम्र्बाटा स्कूटरवरुन ‘कालेज लाईफ’ एन्जाय करणारे विद्यार्थी अवती-भोवती वावरत आसताना मुंडे त्या काळातही विद्यार्थ्यांसाठी झगडले.

वर्ष १९७५. इंदिरा गांधींनी देश्यात आणीबाणी लागू केली. लोकशाहीची पायमल्ली करणारा कालखंड देश्यात सुरु झाला होता. गोपीनाथ मुंडे law च्या थर्ड इयर ला होते. इंदिरा गांधींनी जेपींसह सर्व जेष्ठ नेत्यांची धरपकड केली होती. गोपीनाथ मुंडेंनी आणीबाणीला प्रखर विरोध करत आंदोलनात उडी घेतली होती. त्यांना मार्गदर्शन करत होते वसंतराव भागवत. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या झंजावाती भाषणांनी महाराष्ट्र हदरवुन सोडायला सुरुवात केली होती. वरिष्ठ नेत्यांच्या आदेश्यानुसार गोपीनाथ मुंडेंनी औरंगाबाद येथे आणीबाणी विरोधी आंदोलन तीव्र केलं. याच काळात ते भूमिगतही झाले. प्रमोद महाजन तर संपूर्ण मराठवाड्याचे नेतृत्व करत होते. इंदिरा सरकारने दडपशाही करत मुंडे आणि महाजन यांच्यासह सर्व जेष्ठ नेत्यांना अटक केली. नाशिकच्या हरसूल चा सेंट्रल जेल जणू आणीबाणी विरोधी नेत्यांची पंढरीच बनला होता. त्यावेळी जेल मधील १६ महिने हा होता मुंडेंच्या राजकीय जीवनातला टर्निंग पॉईंट.

जुलमी राजकीय व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी राजकीय जीवनात सक्रिय होण्याचा गोपिनाथ मुंडेंचा निर्धार याच काळात पक्का झाला होता. तुरुंगात सर्व जेष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन आणि बौद्धिक यामुळे मुंडेंची राजकीय परिपक्वता वाढली होती. राज्यभरातून कित्येक हजार राजकीय कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याची संधी गोपीनाथ मुंडेंना आणिबाणीतल्या कारावासाने दिली. मोहन धारिया, बाबा भिडे, प्रमोद महाजन, बापू काळदाते यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांशी गोपीनाथ मुंडेंची घट्ट जवळीक झाली ती याच काळात. गोपिनाथ मुंडेंच्या प्रवासात आणीबाणीचे स्थान महत्वाचे आहे. कारण याच काळाने घडवला आयुष्यभर संघर्षयाची मशाल धडधडत ठेवणारा झुंजार नेता.

अखेर जनतेच्या रेट्यापुढे इंदिरा गांधींना नमावं लागलं, आणि आणीबाणी मागे घेतली गेली. नाशिक च्या तुरुंगात अटकेत असलेले गोपीनाथ मुंडे बाहेर पडले तेव्हा एका झंजावाती नेतृत्वाचा जन्म झालेला होता. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत मुंडेंनी जनता पार्टीचा प्रचार करत अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. रस्त्यावर पक्ष्यासाठी हा नेता लोकांमधून निवडून यावा अशी अपेक्ष्या व्यक्त होऊ लागली. मुंडेंना रेणापूर मतदार संघातून विधानसभा लढण्याचे आदेश १९७८ मध्ये पक्ष्याने दिले. अवघ्या ११०० मतांनी मुंडे हि निवडणूक हरले. पण, विजयाचा आनंद व्यक्त करण्याची संधी कार्यकर्त्यांना मुंडेंनी लवकरच दिली. १९७८ ला जिल्हा परिषद निवडणुकीत मुंडे विक्रमी मतांनी विजयी झाले. हि जणू पुढच्या विजयाची नांदीच होती. १९८० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत रेणापूर मतदार संघातून मुंडे निवडून आले आणि पहिल्यांदा आमदार झाले.

याच काळात भाजप चा जन्म झाला आणि युवा मोर्च्याचे राज्यअध्यक्ष पद मुंडेंना देण्यात आले. पुढे एका पाठोपाठ एक नव्या जबाबदाऱ्या मुंडेंना मिळत गेल्या. १९८६ मध्ये गोपीनाथ मुंडे राज्य भाजप अध्यक्ष झाले. याच काळात मुंडे-महाजन जोडीने महाराष्ट्रा पिंजून काढला. आज राज्यभर विस्तारलेल्या राज्य भाजप ची पायाभरणी मुंडे-महाजन जोडीने त्यावेळी केलेल्या कामात आहे. वसंतराव भागवत आणि उत्तमराव पाटील यांचे मार्गदर्शन आणि प्रमोद महाजनांची भक्कम साथ यामुळे मुंडेंचे नेतृत्व फुलत गेले. शेतमजुरांचे प्रश्न, दुष्काळी जनतेच्या हाल-अपेष्टा यासाठी गोपीनाथ मुंडे अथक संघर्ष करत होते.

आंदोलने, मोर्चे, बैठका आणि कार्यकर्त्यांशी सततचा संवाद, मुंबई-नागपूर पासून गावा-गावापर्यंत गोपीनाथ मुंडेंचा हा संघर्ष सुरु होता. राज्य भाजप मुंडेंच्या नेतृत्वाखाली आक्रमक होत होता. राजकीय ध्येयाबरोबरच मुंडेंचे सामाजिक भानही जागृत होते. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर असो कि प्रादेशीक विकासाचा असमतोल, गोपीनाथ मुंडे लढण्यासाठी जनतेसोबत पुढे असत. राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात वैयक्तिक संपर्क असलेला लोकनेता अशी सार्थ ओळख गोपीनाथ मुंडेंची झाली होती. जनतेशी नाळ जुळलेला नेता कसा असतो याचं दर्शन जनतेला होत होतं. १९९० च्या निवडणुकीत निवडून आलेल्या ४२ आमदारांचे विधिमंडळात नेतृत्व करण्याची जबाबदारी गोपीनाथ मुंडेंना देण्यात आली. १२ डिसेंबर १९९२ रोजी गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते बनले. विधिमंडळात आणि विधिमंडळाबाहेरही मुंडेंचा संघर्ष सुरूच होता.

राजकारणाचे झालेले गुन्हेगारीकरण मुंडेंनी ऐरणीवर आणले. याच काळात गोपीनाथ मुंडे विरोधात शरद पवार असा संघर्ष महाराष्ट्राने पाहिला. मुख्यमंत्रीपदी असलेल्या पवारांविरोधात मुंडेंनी रान उठवले. याच काळात गाजली ती मुंडेंनी शिवनेरी ते शिवतीर्थ हि राज्यातल्या ३०० तालुक्यांना भेट देणारी ‘संघर्षयात्रा’. राज्यात सत्ताबदल होणार याची गवाही देणारी हि यात्रा होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडेंच्या अथक प्रयत्नांनी मंत्रालयावर भगवा फडकवण्याचं स्वप्न आवाक्यात आले होते.

मुंडेंच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष म्हणजे १९९५. गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. मुंडे विरुद्ध पवार या सामन्यात मुंडेंची सरशी झाली होती. राज्यव्यापी प्रचाराला फळ आलं होतं. बाळासाहेब ठाकरेंचा करिष्मा, अटल बिहारी वाजपेयींच्या सर्वसमावेशक नेतृत्वाची मोहिनी, प्रमोद महाजनांची तुफानी वक्तृत्वाची किमया आणि गोपीनाथ मुंडेंचा वाडी-वस्त्या-तांड्यांवर कमळ पोहोचवणारा झंजावाती बहुजन चेहरा यामुळे हे यश मिळाले होते.

भाजप साठी दिल्लीत प्रमोद महाजन आणि मुंबईत गोपीनाथ मुंडे यांचा शब्द कार्यकर्त्यांसाठी प्रमाण होता. मुंडे-महाजन जोडगोळीचा तो सुवर्णकाळ होता. गृहखाते सांभाळताना मुंडेंनी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर भर दिला. पोलीस दलाला शस्त्रे मिळावीत म्हणून त्यांनी निधीची तरतूद केली. मुंबईत डोके वर काढलेल्या गॅंगवॉर चा खात्मा केला. गुंडांच्या केल्या गेलेल्या एन्काऊंटर वरही टीका झाली. पण यात मुंडे पोलीस दलाच्या पाठीशी ठाम उभे राहिले.

सत्तेच्या केंद्रस्थानी असतानाही मुंडेंनी आपल्यातला माणूस मात्र हरवू दिलेला नव्हता. सत्तेच्या वलयातही त्यांच्यातला कार्यकर्ता जागृत होता. जनतेच्या गराड्यातला नेता हीच मुंडेंची ओळख होती. १९९९ सालच्या विधानसभेत युतीची सत्ता गेली. पण मुंडेंभोवतीची गर्दी कायम होती. १९९९ ते २०१४ हा काळ मुंडेंसाठी कसोटीचा होता. १९९९ नंतर विरोधी पक्ष्याच्या राहून मुंडेंनी सतत संघर्ष केला. १९९९ आणि २००४ मध्ये मुंडे आमदार म्हणून निवडून आले. २००९ साली खासदार म्हणून दिल्लीत गेल्यानंतर संसदेतही त्यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीने ठसा उमटवला. ओबीसी बांधवांच्या हककांसाठी आवाज उठवला. २०१४ ची लोकसभा म्हणजे मुंडेंसाठी युद्धच होते. मुंडे ते युद्ध एकटे लढले आणि जिंकलेही. जाणकर, शेट्टी, आठवले, असे एकेक साथीदार जोडत त्यांनी महाराष्ट्रात महायुतीला आकार दिला. राज्याची सखोल, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जण असलेला मुंडेंसारखा नेता होता म्हणूनच महायुती आकाराला आली.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात मिळालेल्या यश्यात मुंडेंचा सिंहाचा वाटा होता. नंतरच्या होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी एक सक्षम लोकनेता म्हणून मुंडेंकडेच पाहिलं जात होतं. दिड दशकाहून अधिक काळ विरोधात संघर्ष केल्यानंतर मुंडे केंद्रात मंत्री झाले होते. राज्यातही मुख्यमंत्री पदासाठी त्यांचेच नाव चर्चिले जात होते. पण, नियती वाईट निघाली! मुंडेंसारखा विविध समाज घटकांना एकत्र सामावून घेणारा नेता क्वचितच पाहायला मिळेल.

२६ मे २०१४ रोजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री म्हणून मुंडेंनी शपथ घेतली. मुंडेंना पुन्हा मंत्रिपद म्हणजे त्यांच्या तमाम कार्यकर्त्यांना, समाजातल्या वंचित घटकांना आनंदाचा क्षण होता. ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचा निश्चय त्यांनी बोलूनही दाखवला होता….पण, जो आवडे सर्वांना, तोचि आवडे देवाला!

या उमद्या नेत्याची ३ जून २०१४ रोजी देश्याच्या पटलावरून चटका लावणारी एक्सिट झाली. शेवटच्या श्वासापर्यंत वंचितांचे अश्रु पुसनारा समर्थ लोकनेता, उत्कृष्ट वक्ता, राजकारणापलीकडेही मैत्री जपणारा हा संघर्षयाचा शिलेदार हरपला. अलोट जनसागराचे दान आपल्या वारसाच्या झोळीत झोळीत टाकून योद्धा निघाला, पुन्हा कधीच परत न येण्यासाठी! तमाम मुंडेप्रेमींचे ‘साहेब’ गेले.

लेखन- अजय कुटे (निस्वार्थी योद्धा मुंडे साहेबांचा)Loading…
Loading...