fbpx

सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी लोकसभा निवडणूक सोपी नाही : खरटमल

सोलापूर- (सूर्यकांत आसबे) सोलापुरात अडचणीत असलेल्या काँग्रेस पक्षाला सावरण्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशिवाय दुसरा कोणताच चेहरा समोर नसल्याने बेचैन झालेल्या काँग्रेसला पुन्हा वर्षभराने पक्षातील लक्ष्मीपुत्र म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या रूपाने जुनाच चेहरा मिळाला आहे. मागील वर्षी याच तारखेला आपल्या स्वतःच्या वाढदिनी तडकाफडकी काँग्रेस शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले सुधीर खरटमल यांनी गुरुवारी वाढदिनी काँग्रेस पक्षाला जादूची झप्पी देत आपण काँग्रेस पक्षातच आहोत आणि सुशीलकुमार शिंदे यांचेच काम करणार असल्याचे सांगत काँग्रेसमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आणली आहे.

सुधीर यांच्या काँग्रेस पक्षातील आगमनाने पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक तशी सोपी नसल्याचे सांगत तब्बल दीड लाखाहून अधिक मतांची गोळाबेरीज करताना सर्वांनाच जीवाचे रान करावे लागणार असल्याचे सांगत निवडणूक सोपी नसल्याचा धोक्याचा इशारा दिला आहे. तर वर्षभरापासून काँग्रेस पक्षाचा गाढा कसाबसा ओढणाऱ्या शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह पदाधिकाऱ्यांचाही जीव भांड्यात पडला आहे.

सुधीर खरटमल हे अनेक वर्षांपासून शिंदे यांचे विश्वासू म्हणून कार्यरत आहेत. तसे तर जेष्ठ नेते स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांनीच सुशीलकुमारांची कमांड सांभाळली. मात्र विधानपरिषद न मिळाल्याने कोठे परिवार शिंदे यांच्यापासून दुरावला. विष्णुपंत कोठे यांचे चिरंजीव माजी महापौर व सध्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी शहर मध्य मतदार संघातून आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढविली परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला. तेव्हापासून कोठे विरुद्ध शिंदे वाद सुरु झाला.

विष्णुपंत कोठे दुरावल्यानंतर लक्ष्मीपुत्र सुधीर खरटमल यांच्याकडे सर्व सूत्रे आली. खरटमल यांच्या खांद्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर आंदोलने आणि कार्यक्रमांचा धडाका सुरु झाला. खरटमल यांनी पाण्यासारखा पैसा खर्च करून कार्यकर्ते जोडण्यात यश मिळविले. परंतु कालांतराने आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे खरटमल डिस्टर्ब होऊ लागले. यातून आमदार प्रणिती आणि खरटमल यांचे उघडपणे दोन गट पडले आणि इथूनच अंतर्गत वादाची ठिणगी पडली.

सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी जीवाचे रान करणारे खरटमल यांनी कोणतेही कारण न देता मागील वर्षी आपल्या वाढदिनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेस पक्षात एकच खळबळ माजली. सुशीलकुमार शिंदे एकतर पराभूत झाल्यापासून सोलापुरात फारसे येत नव्हते आणि आलेच तर विनाकारण दुसरेच त्यांना काहीतरी ऐकावे लागत असे. त्यातच लिंगायत समाजाचा चेहरा म्हणून शिंदे यांनी प्रकाश वाले यांच्यावर प्रभारी म्हणून शहराध्यक्षपदाची सोपविली. परंतु पक्ष चालविताना पैसे लागतात आणि आंदोलने करायची झाली तर सोय केल्याशिवाय कार्यकर्ते बाहेर पडत नाहीत याची जाणीव असतानाही वाले यांनी कसाबसा कारभार चालविला.

दरम्यान लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यानंतर शिंदे यांच्याशिवाय निवडणुकीत खर्च करणारा दिलदार माणूस पक्षात नाही याची सर्वांना जाणीव होऊ लागली. त्यातच सुधीर खरटमल शिंदे यांच्यापासून दुरावल्याने कार्यकर्ते तणावात होते. सुधीर यांची अनेकांनी मनधरणी करूनही त्याचा उपयोग झाला नाही. त्यांना भाजप आणि शिवसेनेत येण्याचे निमंत्रणही देण्यात आले होते. मात्र त्यांनी राजकारणापासून दूरच राहण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवारी सुधीर यांचा वाढदिवस होता आणि हीच संधी साधून शहराध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले यांनी अचानकपणे त्यांच्या कार्यालयात जाऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी खरटमलम्हणले की, आपण काँग्रेस पक्षातच असून शिंदे साहेबांचेच काम करणार असल्याचे सांगत काँग्रेस पक्षातील मंडळींना आणि शिंदे परिवाराला जादूची झप्पी दिली. सुधीर यांनी आपल्या वाढदिनी पुन्हा काँग्रेस पक्षाचे काम करण्याचा निर्णय बोलून दाखविल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना ऊर्जा निर्माण झाली आहे. शिंदे यांच्या अनेक निवडणूक सहजासहजी कव्हर करणाऱ्या सुधीर खरटमल यांनी आगामी सुशीलकुमारांची लोकसभा निवडणूक सांभाळताना फारशी अडचण येणार नाही अशी चर्चा सुरु झाली आहे.

1 Comment

Click here to post a comment