fbpx

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होण्यासाठी सर्वपक्षीयांचं एकमत व्हावं: राष्ट्रपती रामनाथ कोविंद

President-Ramnath kovind

नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. राष्ट्रपतींनी लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांच्या संयुक्त बैठकीत सेंट्रल हॉलमध्ये भाषण केलं. सरकार सर्व घटकांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी राष्ट्रपतींनी व्यक्त केला. तसेच  लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होण्यासाठी सर्वपक्षीयांचं एकमत व्हावं, असं आवाहनही केलं.

महिलांसाठी मॅटनिर्टीच्या सुट्ट्या १२ ऐवजी २६ आठवडे, ‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ योजनेचा विस्तार, गरीब आणि मध्यमवर्गाला विना गॅरंटी कर्ज असे अनेक महत्वपूर्ण मुद्दे त्यांनी आपल्या भाषणात मांडले. देशातील कमकुवत वर्गांसाठी माझे सरकार कटिबद्ध असून देशातील सामाजिक न्याय तसेच आर्थिक लोकशाहीला सशक्त करणे आणि सामान्य नागरिकांचे जीवन सुलभ करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. माझ्या सरकारने तिहेरी तलाक संबंधी एक विधेयक संसदेत सादर केले आहे. मला आशा आहे की, संसदेत लवकरच त्याला कायद्याचे रूप येईल. तिहेरी तलाकवर कायदा झाल्यानंतर मुस्लीम भगिनी आणि मुलींना आत्मसन्मानाने भयमुक्त जीवन जगता येईल, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीसमोरील अभिभाषणात केले. परंपरेनुसार राष्ट्रपती कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर अभिभाषण केले.