आठ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद,करमाळा नगरपरिषदेला ठोकले कुलूप

करमाळा- करमाळा शहराला गेल्या 8 दिवसांपासून एक थेंब ही पाणीपुरवठा झालेला नाही. दोन वेळा दुरुस्ती होऊन ही केलेली दुरुस्ती दर्जाहीन कामामुळे कुचकामी ठरली. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन, मुख्याधिकारी व विद्यमान नगराध्यक्ष हेच या कृत्रिम पाणी टंचाईला जबाबदार असून जिल्हा प्रशासनाने याबाबत उपाययोजना करावी जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत नगरपरिषद कार्यालयास कुलूप ठोकून बागल गटाचे सर्व नगरसेवक व उपस्थित संतप्त नागरिकांनी कामकाज बंद केले.

आज करमाळा शहराला सलग 8 व्या दिवशी ही पाणीपुरवठा न झाल्याने संतप्त नागरिकांनी बागल गटाच्या सर्व नगरसेवकांसह पालिकेवर मोर्चा नेऊन तेथील उपस्थित अधिक-यांना जाब विचारला परंतू टंचाईच्या आणिबाणीच्या काळातही पलिकेत मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष गैरहजर होते. याबाबत संतप्त नगरसेवक व नागरिकांनी जाब विचारला असता उपस्थित अधिका-यांनी जुजबी उत्तरे दिली. पाणी पुरवठा अधिकारी फिरोज शेख यांना भ्रमणध्वनीव्दारे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन करमाळा शहराला पाणी पुरवठा सुरु झाला आहे असे बेजबाबदार विधान केले. त्यामुळे नागरिकांच्या संतापात अधिकच भर पडून नगरसेवकांसह नागरिकांनी नगरपालिकेच्या कार्यालयास कुलूप ठोकून निषेधाच्या घोषणा दिल्या.

विरोधी पक्षनेते श्रीनिवास कांबळे, शौकत नालबंद व नगरसेवक अविनाश घोलप यांनी अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्याशी फोनवरुन संपर्क करुन या परिस्थितीवर चर्चा केली व मुख्याधिकारी विणा पवार या पाणी टंचाईच्या काळात बेजबाबदारपणे मुख्यालय सोडून निघून गेल्या आहेत व त्यांचा फोन ही बंद आहे अशी तक्रार करुन त्यांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी करत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी यांनी याबाबत तातडीने कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

करमाळा नगरपालिकेच्या मालकीच्या विंधन विहीरी व पाण्याचे स्त्रोत उपलब्ध असताना ही केवळ नगरपालिकेच्या उदासिन भूमिकेमुळे टंचाईची तीव्रता वाढली आहे.पाणीपुरवठा उद्यापर्यंत सुरळीत करावा अन्यथा नगरपालिकेचे टाळे काढणार नसल्याची भूमिका संतप्त नागरिक व नगरसेवकांनी घेतली आहे. यावेळी विरोधी पक्षनेते श्रीनिवास कांबळे, न.प. गटनेते शौकत नालबंद, डाॅ. अविनाश घोलप, राजश्री माने, प्रमिला मुकुंद कांबळे, संगिताताई खाटेर, सचिन घोलप आदि नगरसेवकांसह असंख्य संतप्त नागरिक उपस्थित होते.