सिंघू बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या विरोधात स्थानिक रहिवासी रस्त्यावर उतरले

farmer protest

नवी दिल्ली : २६ जानेवारी रोजी कृषी कायद्यांच्या निषेधार्थ संयुक्त शेतकरी संघटनांनी दिल्लीतील हद्दीत प्रवेश करून ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. यावेळी, पोलिसांनी दिलेला मार्ग सोडून आंदोलक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा दिल्लीतील इतर भागात वळवला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता धुमश्चक्री उडाली.

या आंदोलनामुळे प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागले. देशभरातून दिल्ली पोलिसांनी प्राणपणाने लढत दाखविलेल्या अतुल्य पराक्रमाचे, धैर्याचे आणि संयमाचे कौतुक होत आहे.दिल्ली पोलिसांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी शेतकरी नेत्यांनी दिलेलं वचन पाळलं नाही, असा दावा करत हिंसाचाराला कारणीभूत असलेल्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही, अशा शब्दांत कडक कारवाईचा इशारा दिला.

दरम्यान,दिल्लीतल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये घडलेल्या हिंसक घटनांनंतर काही शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली आहे. राष्ट्रीय किसान मजदूर संघटन आणि भारतीय किसान युनियन या संघटनांनी आंदोलनातून माघार घेतल्याचं आज जाहीर केलं. आंदोलनातील काही घटक वेगळ्याच दिशेनं जात असल्यामुळे आपण आंदोलनातून माघार घेत असल्याचं राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक वी. एम. सिंग यांनी सांगितलं.

काल दिल्लीत जे काही घडलं ते अत्यंत खेदजनक आहे, असं सांगत भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष ठाकूर भानु प्रताप सिंग यांनी आपला निर्णय जाहीर केला. दरम्यान दिल्लीतल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज २५ खटले दाखल केले आहेत.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता सिंघू बॉर्डरवर स्थानिकांनीच शेतकऱ्यांच्या नावाने आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. सिंघू बॉर्डरवर रिकामी करावी यासाठी सिंघू बॉर्डरवरील स्थानिक रहिवासी आता रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर जो तिरंग्याचा अपमान केला तो चुकीचा आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. स्थानिकांनी लगेचच हायवे रिकामा करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी हायवेवर आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

महत्वाच्या बातम्या