चा-याखाली दडवलेली देशी दारू जप्त, १८ बॉक्ससह ट्रॅक्टर जप्त

औरंगाबाद : ट्रॅक्टरमधील चा-याच्या गंजीखाली देशी दारूची दडवून वाहतूक करणा-या चालकाला गुन्हे शाखा पोलिसांनी मंगळवारी रात्री पकडले. ही कारवाई झाल्टा फाटा ते चिकलठाणा रस्त्यावरील जुन्या बीड बायपास रस्त्यावर करण्यात आली. गणपत धोंडीबा नजन (४०, रा. दरेगाव) असे ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी देशी दारूचे १८ बॉक्स आणि ट्रॅक्टर असा एकूण दोन लाख ६९ हजार ९२८ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

ट्रॅक्टरमधील चा-याच्या गंजीखाली देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, जमादार संतोष सोनवणे, विशाल पाटील, चंद्रकांत गवळी, रितेश जाधव, आनंद वाहुळ यांनी झाल्टा फाटा ते चिकलठाणा रस्त्यावर मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास सापळा रचून ट्रॅक्टर (एमएच-२८-डी-२५८९) अडवला. तेव्हा पोलिसांनी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची झडती घेतली.

ट्रॉलीमध्ये चा-याच्या गंजीखाली देशी दारूचे १८ बॉक्स मिळून आले. पोलिसांनी ट्रॅक्टरची झडती घेत असताना दुचाकीवर (एमएच-२०-एफजे-७२१२) जगन्नाथ एकनाथ जोशी (रा. मुकुंदनगर, मारोती मंदिराजवळ) हे तेथे आले. पोलिसांनी त्यांना देखील ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी हा देशी दारूचा साठा मुकुंदवाडी परिसरातील रहिवासी सुमनबाई पिराजी गायकवाड (रा. मुकुंदनगर) हिचा असल्याचे ट्रॅक्टर चालक गणपत नजन आणि जगन्नाथ जोशी यांनी सांगितले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या