fbpx

कर्जमाफी योजनेअंतर्गत एक रकमी परतफेडीसाठी ३१ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ : सुभाष देशमुख

टीम महाराष्ट्र देशा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफी ची प्रक्रिया सुरू आहे. यात एक रकमी परतफेड योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हिस्स्याची रक्कम भरण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

मंत्रालयात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न झाली. बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री अनिल बोंडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, संबंधित विभागाचे अधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

“एक रक्कम परतफेड घटकामध्ये” ज्या पात्र लाभार्थ्यांची योजनेमध्ये मंजूर केलेली रक्कम रु. १.५० लाखाच्या वर आहे, अशा शेतक-यांना रुपये १.५० लाखावरील त्यांच्या हिस्याची रक्कम भरल्यानंतर योजनेअंतर्गत रुपये १.५० लाखाच्या मर्यादेपर्यंत कर्ज माफी देण्यात येते. सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ शेतक-यांनी घ्यावा जेणेकरुन त्यांना चालू खरीफ हंगामामध्ये पीककर्ज घेणे सुकर होईल असे आवाहन सहकारी मंत्री देशमुख यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये सद्यस्थितीत सुमारे ५० लाख खातेदारांना रुपये २४३१० कोटी रक्कम मंजूर करण्यात आली आहेत.आतापर्यत सुमारे ४४ लाख खातेदारांना रु.१८५०० कोटीचा लाभ देण्यात आला आहे असेही सुभाष देशमुख यांनी सांगितले.