लिव्ह इन रिलेशनशिप.. मृगजळातील वास्तव…

विनीत वर्तक: अमेरिकेच्या संस्कृतीच अप्रूप आपल्या भारतीयांना खूप असते. मोकळेपणा, स्वातंत्र्य आणि आपल्या दृष्ट्रीने असेलला स्वैराचार हा त्यांच्या नॉर्मल आयुष्याचा भाग असतो. अश्या काही अमेरिकन मित्र- मैत्रिणी सोबत भारतीय लग्नसंस्था आणि एकूणच अमेरिकन कुटुंब व्यवस्था ह्यात संवाद झाला. त्यात समोर आलेले काही मुद्दे नक्कीच शेअर करावेसे वाटतात.

भारतीय लग्नसंस्थेचे तोटे अमाप आहेत. मन मारून एकाच व्यक्तीसोबत आयुष्य काढण्याच दिव्य आधीच्या पिढीने पेलल असल तरी आत्ताची पिढी ते पेलेल कि नाही याची शंका आहे. स्वातंत्र्य जन्मापासून अनुभवलेली हि पिढी पहिल्यापासून आपल्या विचारात ठाम आणि निर्णय स्वातंत्र्य ठेवणारी आहे. लग्न संस्थेतील तडजोडी मान्य करणारी मुळीच नाही म्हणून लिव्ह इन रिलेशनशिप हा अमेरिकन प्रकार आता आपल्या समाजाचा भाग बनू पाहतो आहे. किंबहुना तो बनला आहे. तुम्ही, आम्ही विचार करतो त्या पेक्षा अधिक वेगाने आपल्या घरात तो पोहचला आहे. आपल्या जोडीदाराच ओझ नको, मूल-बाळ ते सासू- सासरे अश्या सगळ्या नात्यांपासून सुटका. कोणी प्रश्न विचारण नको ते कोणाला उत्तर देण नको. आपल्या आयुष्याच आपणच कर्ता करविता. आज वाटल तर राहिलो एकत्र, घालवले काही क्षण सगळ्याच लेवल वर. उद्या नाही वाटल तर तुझा- माझा रस्ता वेगळा. वाटल तर पुढे पुन्हा परत एकत्र. स्वातंत्राच्या ह्या अभूतपूर्व कल्पनेने आपण हुरळून गेलो नाहीत अस होणारच नाही. स्पेशली ज्या समाजाने पिढ्यान पिढ्या लग्न संस्थेचे, स्त्री च्या अत्याचाराचे आणि नातेसंबंधांच एकूणच ओंगळवाण प्रदर्शन बघितल आहे त्यासाठी हा प्रकार म्हणजे जेलमधून झालेली सुटकाच.
मोकळ्या हवेची सवय नसताना हे स्वातंत्र्य कितीही आवडल तरी त्या मोकळ्या हवेतील मृगजळ लक्षात येत तोवर बरच पाणी पुलाखालून वाहून गेलेलं असत. लग्नसंस्था चांगली का वाईट ह्या प्रश्नात मला जायचे नाही कारण दोन्ही प्रवृत्ती त्यात असताना एक उत्तर आपण देऊ शकत नाही. आधी कोंबडी कि अंड असाच हा प्रकार दोन्ही सापेक्ष. पण त्याच वेळी लिव्ह इन रिलेशनशिपच अंधानुकरण होऊ नये ह्यासाठी दोन्ही गोष्टी त्यांच्या नफ्या तोट्यासहित पुढच्या पिढीकडे मांडता यायला हव्यात बाकी शेवटचा निर्णय त्यांचाच. अमेरिकेत संवाद करताना हि संस्कृती अमेरिकेत अनेक पिढ्यांचं प्रतिनिधित्व करत आलेली आहे. माझ्या मित्राने एक मांडलेला मुद्दा मला निरुत्तर करून गेला. अमेरिकेत काय सगळेच फ्री नाहीत. त्यांच्यात पण कमीटमेंट असते. मोकळेपणा, स्वातंत्र्य असल तरी स्वैराचार हा तिकडे हि नात्यात खपवून घेतला जात नाही. पण मग हे स्वातंत्र्य मिळून सुख , समाधान आहे का? तर उत्तर हो आणि नाही अस आहे.
हो यासाठी कि आपल्या मर्जीनुसार जगता येत. पण कोणी आपल होत नाही. आपल झाल तरी त्यातल आपलेपण कधी संपेल ह्याची शाश्वती देता येत नाही. तिकडे नाती फुलतात उमलत नाही. कारण उमलण्यासाठी वेळ असतो कोणाकडे. मग जे जाणवत ते भीषण असते. माझ्या मित्राच्या मते तो घरी परत आला कि नाही त्याच्या आई किंवा बाबाला काही फरक पडत नाही. आई एका दुसऱ्या सोबत राहते. बाबा एका दुसऱ्या स्त्री सोबत आहेत. त्यांना जी पहिली मुल आहेत ते सगळे ह्याचे हाफ बहिण- भाऊ. ह्या सगळ्यात आपुलकी आली कुठे? करियर, पैसा, स्टेटस सगळ कमावताना एवरेस्ट वर पोचल्यावर ते बघणार कुणी लागते. ते असेल का ह्याची शाश्वती लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये नाही. नो स्ट्रिंग अट्याच असताना धागे मोकळेच रहाणार.

in-relationship-1-1502193006
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहायचं पण कमीटमेंट नाही. प्रेम असल तरी ते किती वेळ, वर्ष टिकेल ह्याची शाश्वती नाही. ८ तास एकत्र ऑफिस मध्ये घालवल्यावर आपल्या कलीग सोबत आपला जीव लागतो त्याच्या जाण्याने मन अस्वस्थ होते. तर आयुष्य शेअर केलेल्या व्यक्ती सोबत अशी रिलेशनशिप तुटली तर ते पचवण इतक सोप्प असेल? त्यात अजून एखादा जीव गुंतला असेल तर? बर आपण अयशस्वी झालो किंवा आयुष्याच्या वेगात एखादा अपघात घडला असताना आपल माणूस सगळ्यात जास्ती जवळ हवहवस वाटताना ती कमीटमेंट जोडीदाराने नाकारली तर सगळ पेलून नेण सोप्प असेल का? आयुष्याच्या उत्तरार्धात आपल कोणीतरी नेहमी आपल्या सोबत प्रवास केलेलं नसेल तर ते एकटेपण किती त्रासदायक असेल ह्याचा अंदाज पण नाही आपल्याला. लास वेगास ला असताना असे अनेक जण मला भेटले. आयुष्यात खूप पैसा कमावला पण भावनांचा फुटबॉल झाल्यावर आता खेळावस वाटत नाही. म्हणून तिकडे बसून जुगार खेळणारे अमेरिकेत खूप बघायला मिळतील.
माझ्या मित्राच्या भाषेत ‘यु इंडियन आर लकी. यु ह्याव समवन हु विल स्किप मिल फॉर यु, प्रे फॉर यु, यु ह्याव समवन व्हू विल वेटिंग फॉर यु. व्ही अमेरिकन आर फ्री सो व्हेन आय गो ब्याक होम आय ह्याव टू सर्च फॉर माय पिपल’. ह्या त्याच्या वाक्यात त्याने मला पूर्ण लिव्ह इन रिलेशनशिपचा अर्थ सांगितला. भारतीय लग्नसंस्था हि अनेक वर्षांच्या अभ्यासातून पुढे आली आहे. नक्कीच पुरुषाला वर्चस्व देणारी आणि स्त्री ला कमी महत्व देणारी त्याची परिभाषा चुकीची आहेच. पण मुळापासून सगळच चुकीच सांगताना त्याला पर्याय आपण देत आहोत का हा विचार करायला हवा. लिव्ह इन रिलेशनशिप हाच जर पर्याय असेल तर त्याच्या हि इतिहासाचा किंवा ती संस्कृती काही पिढ्या अनुभवलेल्या लोकांकडून अभ्यास व्हायला हवा.
लिव्ह इन रिलेशनशिप हे स्वातंत्र्य आहे पण त्याच सोबत मृगजळ पण आहे. भारतीय लग्नसंस्था हे शाश्वत पण बंधन असलेल स्वातंत्र्य आहे. पुढल्या पिढीने काय निवडायच हा निर्णय नक्कीच त्यांचा आहे. पण नाणाच्या योग्य त्या बाजू समोर मांडणे हे आपले पालक म्हणून कर्तव्य आहे. लग्नसंस्था किंवा लिव्ह इन रिलेशनशिप ह्या दोहोत चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी आहेत. तडजोड दोन्ही कडे आहे. समजून घेण दोन्हीकडे आहे. पण त्याचे वेळी दोन्हीकडे दाहक बाजू हि आहेत. हे सगळ समर्थपणे आपल्या पुढल्या पिढीला समजून द्यायचं असेल तर आपण ते समजून घेण्याची गरज आहे अस मला तरी वाटते.