भारताने मालिका 4-0 ने जिंकली

blank

चेन्नई : करुण नायरच्या त्रिशतकानंतर रवींद्र जाडेजाच्या भेदक गोलंदाजीमुळे, भारताने चेन्नई कसोटीतही तिरंगा फडकवला. टीम इंडियाने इंग्लंडला पाचव्या कसोटीतही पाणी पाजून, मालिका 4-0 ने खिशात टाकली आणि ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

चेन्नई कसोटी भारताने 1 डाव आणि 75 धावांनी जिंकली.

करुण नायर या विजयाचा नायक आहेच, पण 199 धावा ठोकणारा सलामीवीर लोकेश राहुल आणि इंग्लंडचा अर्ध्यापेक्षा जास्त संघ तंबूत धाडणार रवींद्र जाडेजा हे सहनायक आहेत. जाडेजाने दुसऱ्या डावात तब्बल 7 विकेट घेतल्या. त्यामुळे इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 207 धावांवर आटोपला.

या सामन्यात डावानं पराभव टाळण्यासाठी इंग्लंडला 282 धावांची आवश्यकता होती. पण अखेरच्या दिवशी किटन जेनिंग्स आणि अॅलेस्टर कूकनं सावध सुरुवात करुन 103 धावांची भागीदारी रचली. पण उपाहारानंतर रवींद्र जाडेजानं प्रभावी मारा करुन इंग्लंडचं कंबरडं मोडलं. रवींद्र जाडेजानं 48 धावांच्या मोबदल्यात इंग्लंडच्या सात फलंदाजांना माघारी धाडलं. तर उमेश, ईशांत आणि अमित मिश्रानं प्रत्येकी एकेक विकेट काढून त्याला छान साथ दिली.