लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल करणार निर्माल्य संकलन

lions

पुणे : लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ तर्फे ‘निर्माल्य दान’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. यंदा गणपती बाप्पांच्या विसर्जनादिवशी म्हणजेच ५ सप्टेंबर २०१७ रोजी निर्माल्य संकलन केले जाणार आहे, अशी माहिती उपक्रमाचे प्रमुख विजय बढे, संयोजक आनंद आंबेकर, प्रसाद खंडागळे, मुकुंद खैरे, प्रवीण ढोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

२००३ पासून नियमितपणे विसर्जनाच्या दरम्यान हा उपक्रम राबविण्यात येतो. नदी पात्रात पडणारे निर्माल्य रोखण्याचे व गोळा करण्याचे, तसेच त्यासाठी समाज प्रबोधन करण्याचे कार्य करण्यात येते. पुण्यातील २०-२२ घाटांवर, तर पिंपरीतील ६-७ घाटांवर लायन्स क्लबचे पदाधिकारी आणि सभासद निर्माल्य संकलन करतात. दोन्हीही पालिकांच्या क्षेत्रीय कार्यालयांचे व वॉर्ड ऑफिसच्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे विसर्जन घाटांवर चांगले सहकार्य मिळते. दरवर्षी ४०-४५ टन इतके निर्माल्य गोळा केले जाते. संकलन केलेले हे निर्माल्य पालिकेकडे खतनिर्मितीसाठी सुपूर्त केले जाते. या निर्माल्य संकलनामुळे मोठ्या प्रमाणात होणारे नदी प्रदूषण रोखण्यात यश आले आहे. गेली अनेक वर्षे या निर्माल्य संकलनात दिवंगत व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचा विशेष पुढाकार होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब निर्माल्य संकलनाचे काम मोठ्या उत्साहाने करत असे. परंतु, यंदा त्यांची उणीव भासेल अशी खंत  उपक्रमाचे प्रमुख विजय बढे यांनी व्यक्त केली .

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील ५२ पेक्षा अधिक लायन्स क्लबमधून जवळपास १००० लायन्स सभासद या उपक्रमात सहभागी होणार आहेत. होळकर घाट, संगम घाट, ओंकारेश्वर घाट, विठ्ठलवाडी घाट, दत्तवाडी घाट, औंध घाट, रहाटणी घाट, चिंचवड मोरया गोसावी घाट, गरवारे पूल, राजाराम पूल, भिडे पूल, वडगाव कॅनॉल, मीरा सोसायटी कॅनॉल, अप्सरा थिएटर कॅनॉल, सारसबाग कॅनॉल, कात्रज तलाव, गणेश तलाव आकुर्डी, तळेगाव इत्यादी घाटांवर हा निर्माल्य दान उपक्रम राबविला जाईल असे मुकुंद खैरे म्हणाले.
या उपक्रमाचा शुभारंभ ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता निलायम टॉकीजजवळील घाटावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, लायन्स क्लबचे प्रांतपाल गिरीश मालपाणी, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोहिते, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी या प्रसंगी या विविध विसर्जन घाटांवर सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे विविध नामवंत भेट देणार असून ते देखील नागरिकांना निर्माल्य पाण्यात न टाकण्याचे व निर्माल्य दान करण्याचे आवाहन करणार आहेत. याही वर्षी मोठ्या प्रमाणात निर्माल्य संकलन करून होणारे नदीप्रदूषण टाळण्यासाठी लायन्स क्लब प्रयत्नशील आहे, असे आनंद आंबेकर म्हणाले.