VIDEO: धर्म मान्यतेसाठी लिंगायत समाजाचा लातूरमध्ये एल्गार

लातूर/ज्ञानेश्वर राजुरे: लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची संविधानिक मान्यता मिळावी तसेच राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक  दर्जा मिळण्याच्या मागणीसाठी लातूरमध्ये लिंगायत समाजाकडून महामोर्चा काढण्यात आला होता. महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगाना आदी राज्यातून बांधव लातूरमध्ये  दाखल झाले होते.  भारतामध्ये लिंगायत समाजाची संख्या लक्षणिय आहे. मात्र, समाज आजही विकासापासून वंचित आहे. त्यामुळे  लिंगायत धर्माला संविधानिक मान्यतेसाठी व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा मिळवा यासाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व १०२ वर्ष असलेले डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी केले. तसेच या महामोर्चात प्रथम महिला जगदगुरु  माता महादेवी, जगदगुरु बसव मृत्युंजय स्वामी, डॉ. बसवलिंग पट्टदेवरु, जगदगुरु यन्न बसवन्न महास्वामी, कोरनेश्वर स्वामी उस्तुरी हे सर्व धर्मगुरुही मोर्चात सहभागी झाले होते.

मोर्चा शांततेत पार पडण्यासाठी समन्वय समितच्या वतीने दोन हजार स्वयंसेवक कार्यरत होते. शहरातील विविध भागात दहा ठिकाणी पार्किंग तर सात ठिकाणी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. `लिंगायत धर्म स्वतंत्र धर्म`, `जगदज्योती बसवेश्वर महाराज की जय`, `आम्ही लिंगायत, आमचा धर्म लिंगायत`, `वब्ब लिंगायत, कोटी लिंगायत` अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेल्याच चित्र आज लातूरमध्ये पहायला मिळाले.