लिंगायत समाजाचे गुरू महंत शिवकुमार स्वामी यांचे 111 व्या वर्षी निधन

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटकच्या तुमकुरू येथील सिद्धगंगा मठाचे प्रमुख, लिंगायत समाजाचे गुरू महंत डॉ. शिवकुमार स्वामी यांचे वयाच्या 111 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. लिंगायत-वीरशैव समाजाच्या सिद्धगंगा मठाचे मठाधीश असलेले शिवकुमार स्वामी हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते.शिवकुमार स्वामी यांच्या मृत्यूनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.याशिवाय, शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.

डॉ. श्री. शिवकुमार स्वामी यांच्यावर गेल्या महिन्यात 8 डिसेंबरला ऑपरेशन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या फुफुसात संसंर्ग झाला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, सोमवारी सकाळी 11 वाजून 44 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.याबाबतची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दिली.

दरम्यान,राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी,विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे,काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करून शिवकुमार स्वामी यांना श्रद्धांजली वाहिली.