लिंगायतांना अल्पसंख्यक दर्जाच्या मागणीसाठी महामोर्चाचे आयोजन

file photo

लातूर: अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने लिंगायत धर्माच्या संवैधानिक मान्यतेसाठी व लिंगायतांना राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी येत्या ३ सप्टेंबर रोजी लातुरात लिंगायत धर्म महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महामोर्चा शतायुषी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार असल्याची माहिती माधवराव पाटील टाकळीकर यांनी दिली. माधवराव पाटील टाकळीकर यांनी सांगितले की, महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात लिंगायत धर्माची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम केले आहे. सन 1952 पर्यंत शासन दरबारी लिंगायत धर्माची नोंद होती. तत्पश्चात या धर्माची मान्यता हिरावून घेतली गेली. त्यामुळे लिंगायत समाजातील बांधवांना धार्मिक अल्पसंख्यांकांच्या कोणत्याही सवलती, हक्क मिळत नाहीत. त्यामुळे लिंगायत धर्मास संवैधानिक मान्यता देण्यात यावी या मागणीसाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा ३ सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा क्रीडा संकुलापासून बार्शी रोडवरील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यँत काढण्यात येणार आहे. मोर्चाचे नेतृत्व शतायुषी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज करणार आहेत. या मोर्चात लातूरसह शेजारच्या उस्मानाबाद, सोलापूर, बिदर जिल्ह्यातील लिंगायत समाजबांधव लाखोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत. मोर्चात साधारणतः चार ते पाच लाख समाज बांधव सहभागी होतील असा अंदाजही टाकळीकर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र वीरशैव महासभेचे अध्यक्ष बाबासाहेब कोरे यांनी यावेळी बोलताना सरकार रस्त्यावर उतरल्याशिवाय समाजाच्या या न्याय मागणीकडे गांभीर्याने पाहणार नसल्याने या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. प्रा. ओमप्रकाश झुरुळे यांनी लिंगायत धर्माची जुनी मान्यता संविधानिक स्वरूपात परत मिळवण्याच्या उद्देशाने हा महामोर्चा काढला जाणार असल्याचे स्पष्ट केले. बालाजी पिंपळे यांनी लिंगायत धर्म लोकशाही प्रक्रियेतून निर्माण झालेला असल्याचे सांगितले. डॉ. अरविंद भातांब्रे यांनी महामोर्चाच्या यशस्वीतेसाठी जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात समित्या गठन करून सूत्रबद्ध नियोजन केले जात असल्याचे सांगितले. यावेळी प्रकाश कोरे, सुनील हेंगणे, मनोज राघो, शरणप्पा अंबुलगे यांची उपस्थिती होती.