fbpx

माझ्याप्रमाणेच पंतप्रधान मोदी हे देखील शिवाजी महाराजांचे भक्त आहेत : गडकरी

नागपूर : लहानपणापासूनच माझ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे संस्कार झाले. माझ्या आयुष्यात आईवडिलांपेक्षा मोठे दैवत शिवराय हेच आहेत. माझे त्यांच्यावर इतर कुणापेक्षाही जास्त प्रेम आहे. माझ्याप्रमाणेच पंतप्रधान मोदी हेदेखील शिवाजी महाराजांचे भक्त आहेत, असे नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. सक्करदरा चौकातील मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या सभागृहात आयोजित शिवसंग्रामच्या मेळाव्यात ते बोलत होते.

या मेळाव्याला माजी खासदार दत्ता मेघे, भाजपाचे शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, आ.भारती लव्हेकर, माजी आमदार मोहन मते, अशोक मानकर, शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील, नगरसेवक दीपक चौधरी, नागेश सहारे, रा.स.प.चे लोकेश रसाळ, शिवसंग्रामचे शहराध्यक्ष दीपक मते, कार्याध्यक्ष विजय रसाळ, संजय भेंडे, जयंत खळतकर आदी नेते उपस्थित होते.

मराठा समजाने प्रगती साधण्यासाठी संकल्प केला पाहिजे. सामाजिक, आर्थिकसह, शैक्षणिक व सांस्कृतिक मागासलेपणदेखील हटले पाहिजे. मराठा समाजाने व्यक्तीनिर्माणाचे काम करावे व समाजातील मुलांना विविध क्षेत्रात समोर जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन देखील गडकरी यांनी केले.

दरम्यान, या मेळाव्यात भाजपच्या महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांवर मेटे यांनी स्तुतिसुमने उधळली. शिवसंग्राम १७-१८ वर्षे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत होती. मात्र त्यांच्या सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न रेंगाळत ठेवला. मराठा-कुणबी समाजाचा एकही प्रश्न सोडविला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र मराठा समाजाला न्याय दिला आहे, असे प्रतिपादन मेटे यांनी केले.