फडणवीसांप्रमाणे महाविकास आघाडीने देखील पेट्रोल-डिझेलवर कर सवलत द्यावी – नवनीत राणा

navneet rana

नवी दिल्ली : महागाई मुळे सामन्यांच्या खिशाला दररोज कात्री लागत असताना गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली इंधन दरवाढ आज देखील कायम आहे. शंभरीच्या जवळ गेलेल्या पेट्रोल आणि डीझेल मध्ये सातत्याने वाढ कायम आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलने या आधीच शंभरी पार केली आहे. या विरोधात सामान्यांसह विरोधी पक्ष देखील आक्रमक होत आहेत.

राज्यात देखील इंधनाच्या दरांनी नवे विक्रम केले असून सत्तेतील महाविकास आघाडीने इंधन दरवाढीचं खापर केंद्र सरकारवर फोडलं आहे. यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील भाष्य केलं आहे. महाविकास आघाडी सरकारने इंधनांवरील राज्य सरकारच्या करांमध्ये सवलत द्यावी जेणेकरून नागरिकांना थोडा दिलासा मिळेल, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.

‘पेट्रोल-डिझेल दरवाढीवर विचार करताना राज्य सरकारनंही नागरिकांना करात सवलत द्यायला हवी. माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या काळात नागरिकांना कर सवलत दिली होती. त्यामुळे पेट्रोलवर अतिरिक्त भार पडला नाही,’ असं भाष्य नवनीत राणा यांनी केलं आहे.

पुढे त्यांनी लॉकडाऊन बाबत करताना महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे. ‘लॉकडाऊनला प्रशासन सर्वस्वी जबाबदार आहे असं म्हणता येणाार नाही. ज्या प्रमाणे सार्वजनिक ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत, नियम पाळत नाहीत, त्यामुळे लॉकडाऊन अपेक्षितच आहे. मात्र, लॉकडाऊन जाहीर करताना सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना वीज बिल माफी देणं सरकारचं कर्तव्य आहे. आधी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ आणि आता फक्त ‘मी जबाबदार’ असं म्हणून सरकारला हात वर करता येणार नाहीत,’ असं देखील नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या