fbpx

लिंगायत महामोर्चाची जय्यत तयारी सुरू

ligayth samaj morch

टीम महाराष्ट्र देशा –  लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा, यासह अन्य मागण्यांसाठी डिसेंबर महिन्यात आयोजित महामोर्चाच्या नियोजनासाठी मंगळवार ७ नोव्हेंबर रोजी समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. लिंगायत समाजाच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही, असा इशारा अखिल भारतीय लिंगायत समाज समन्वय समितीच्या पदाधिका-यांनी दिला. लिंगायत समाजाचे अविनाश भोसीकर, विश्‍वनाथ मिरजकर, अशोक कोष्टी, नामदेव करगणे, प्रदीप वाले, महादेव चिवटे, राजेंद्र कुंभार, संजय पट्टणशेट्टी व संजय विभुते यांनी लिंगायत समाजाच्यावतीने ३ डिसेंबर रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणा-या लिंगायत महामोर्चाची माहिती दिली.

या महामोर्चाची तयारी युध्द पातळीवर सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा व लिंगायत धर्मातील सर्व पोटजातींना ओबीसीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू व केरळ या पाच राज्यात आंदोलन सुरू आहे. त्यानुसार सांगली येथेही लिंगायत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. वास्तविक, सन १९३१ पर्यंत लिंगायत समाजाची स्वतंत्र जनगणना केली जात होती. मात्र स्वातंत्र्यानंतर लिंगायत धर्माची मान्यता रद्द केली आहे.

त्यामुळे आता समाजाच्यावतीने आक्रमक लढा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. लिंगायत समाजाच्यावतीने आयोजित लिंगायत महामोर्चाची जय्यत तयारी युध्दपातळीवर सुरू आहे. त्यासाठी सांगली जिल्ह्यात गावोगावी बैठका घेऊन जनजागृती केली जात आहे. त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.