सोलापुरात पत्नीचा खूनाप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा

सोलापूर : पाचही मुली झाल्याने कोयत्याने झोपेत पत्नीचा खून केल्याप्रकरणी बोराळे (ता. मंगळवेढा) येथील एकास पंढरपूर जिल्हा सत्र न्यायाधीश अभिनंदन पाटणकर यांनी जन्मठेप चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. बाजीराव दामोदर वाघमारे (वय ४०) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. राणी बाजीराव वाघमारे (वय ३७) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचा बाजीराव याच्याशी २००४ मध्ये विवाह झाला होता.

बाजीराव हा आई, वडील, पत्नी राणी, मुलींसह राहत होता. त्याला पाच मुली झाल्याने तो पत्नीवर चिडून होता. पत्नीने ही बाब माहेरी सांगितल्यावर बाजीरावची समजूत काढण्यात आली होती. २७ नोव्हेंबर २०१४ रोजी पहाटे चारच्या सुमारास नात संजीवनी हिची आरडाओरड ऐकून बााजीराव याचे वडील दामोदर बाबू वाघमारे हे जागे झाले. त्यांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता सून राणी ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.

याप्रकरणी राणी हिचा भाऊ तानाजी रामचंद्र माने यांनी फिर्याद दिली. त्यावरून मंगळवेढा पोलिस ठाण्यात बाजीराव याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलिस निरीक्षक दिलीप पाटील यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्यात तपास अधिकारी पाटील यांच्यासह ११ जणांची साक्ष नोंदवण्यात आली. वडील दामोदर यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. घराच्या वरच्या मजल्यावर राणी रक्ताच्या थारोळ्यात पडली असताना तेथे कोयता पडला होता. बाजीरावही तेथेच होता, अशी साक्ष त्यांनी न्यायालयात दिली. ती यात महत्त्वपूर्ण ठरली. आरोपी हा मुलगा असतानाही दामोदार वाघमारे यांनी सर्व गोष्टी सांगितल्या. राणी हिचा कोणताही दोष नसताना केवळ मुलगा होत नाही म्हणून तिचा खून केला. हे कृत्य घृणास्पद, समाजविरोधी आहे. त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, अशी मागणी सरकारी वकील अॅड. सारंग वांगीकर यांनी केली.

Comments
Loading...