मोदी आणि हिंदूंपासून भारताला लवकरच मुक्त करु’;झाकीर मुसा

musa zakir

गायींची पूजा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदूंपासून भारताला लवकरच मुक्त करु’ असा धमकीवजा इशारा अल- कायदाचा काश्मीरमधील प्रमुख झाकीर मुसाने दिला आहे. याचबरोबर जम्मू-काश्मीरमधील रोहिंग्या मुस्लिमांवर कारवाई करु नये असेही मुसाने म्हटले आहे.

झाकीर मुसाने बकरी- ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिमांसाठी एक ऑडियो क्लिप जाहीर केली आहे.’टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार यात मुसाने नरेंद्र मोदी, हिंदू आणि जम्मू- काश्मीर याविषयावर भाष्य केले. देशभरात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या सुमारे ४० हजार रोहिंग्या मुस्लिमांना पुन्हा मायदेशी पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यातील सहा हजार रोहिंग्या मुस्लिम हे जम्मूत राहतात. या निर्णयाचा झाकीर मुसाने विरोध दर्शवला.

झाकीर मुसाने नक्की काय म्हटल आहे 

‘नरेंद्र मोदी आणि सर्व हिंदू एकत्र आले तरी ते आम्हाला रोखू शकत नाही. आम्ही भारतावर इस्लामचा झेंडा फडकावणारच आणि हिंदूंची देशातून हकालपट्टी करु’ असे चिथावणीखोर विधानही त्याने केले आहे. काश्मीरमधील जिहाद विरोधात पाकिस्तानने भारताशी हातमिळवणी केली आहे. पाकिस्तानने जिहाद-ए-काश्मीरच्या पाठीत खंजीर खूपसला. पाकिस्तानी सैन्य आणि सरकार हे आमचे शत्रू आहेत असे त्याने म्हटले आहे. अमेरिकेला मदत करुन पाकिस्तानने काश्मीरमधील जिहादींना दगा देत दहशतवादी तळ बंद केले असून काही दहशतवाद्यांना तुरुंगात पाठवले असा दावाही त्याने केला. दरम्यान झाकीर मुसाच्या क्लिपची जम्मू-काश्मीर पोलिसांनी दखल घेतली आहे. या क्लिपची चौकशी सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.