एमपीएससीच्या परीक्षांचा घोळ सुरूच; मागणी पत्र न दिल्याने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होईना?

mpsc

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एमपीएससीच्या रखडलेल्या परीक्षांबाबत आता शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षांची तारीख लवकर जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे विविध पदांचे मागणी पत्रक उपलब्ध करून न दिल्यामुळे एमपीएससीने 2021 च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. कोरोना,आरक्षण व नोकर भरती बंदीचा शासन निर्णय अशा विविध कारणांमुळे मागणी पत्रक उपलब्ध करून देण्यात आलेले नाही असे समजते.

सामान्य प्रशासन विभागाने आयोगाकडे मागणी पत्रक उपलब्ध करून न दिल्यामुळे आयोगाकडून परीक्षांचे 2021 चे नियोजन नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झालेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्थिरता वाढलेली आहे, वय वाढत चालले आहे, मानसिक व आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे असे एमपीएससी स्टुडंट राइट्स संघटनेने म्हटले आहे.

शासनाच्या विविध विभागात दोन लाखांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. हजारो युवक आपले सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मागील चार ते पाच वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. त्यामुळे शासनाने नोकर भरती बाबत प्रक्रिया सुरू करणे खूप आवश्यक आहे. शासन स्तरावर ही प्रक्रिया थांबल्यामुळे राज्यातील काही उमेदवारांनी आत्महत्या देखील केले असल्याचे समजत आहे. त्यामुळे शासनाने वेळीच योग्य ते पाऊल उचलणे अपेक्षित आहे असे मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात या संघटनेने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP