संकट मोचनवर पुन्हा संकट ; बॉम्बने मंदिर उडवून देण्याची धमकी

टीम महाराष्ट्र देशा : उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील प्रसिद्ध संकटमोचन मंदिर बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांना हे धमकीचं पत्र मिळालं असून 2006 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटापेक्षा मोठा स्फोट घडवून आणू अशी धमकी या पत्राद्वारे देण्यात आली आहे.

सोमवारी रात्री मुख्य पुजाऱ्यांना हे पत्र मिळालं. या पत्रात मंदिराला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकी देण्यात आली आहे. 2006  पेक्षाही मोठा स्फोट घडवून आणू, आमच्या या धमकीकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला या पत्रात देण्यात आला आहे. याबाबत पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून पत्रं देखील पोलिसांच्या हवाली केलं आहे, अशी माहिती संकटमोचन मंदिराचे मुख्य पुजारी महंत विश्वंभरनाथ मिश्र यांनी दिली. सदर पत्रात जमादार मियाँ आणि अशोक यादव या दोघांच्या नावाचा समावेश आहे. पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

यापूर्वी 7 मार्च 2006 रोजी संकटमोचन मंदिर, कँट स्टेशन आणि दशाश्वमेध घाट या ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते. या स्फोटात संकटमोचन मंदिरात 7 आणि कँट स्टेशनमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला होता. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते.

मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी