Share

“अनुदानाचे पैसे लवकर द्या सायेब, मग आई पुरणपोळ्या करील” ; सहावीतील शेतकरी पुत्राचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

हिंगोली : महाराष्ट्रात राजकरण जरी जोमात सुरु असले तरी शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे उभे पिक नष्ट झाले. घोषणाबाज सरकारने जरी शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली असली. तरी शेतकऱ्यांना फुटकी कवडी देखील मिळाली नाही. राजकीय उदासीनतेपोटी शेतकऱ्यांच्या मुलांना देखील याचा सामना करावा लागत आहे. हिंगोली जिल्ह्यातील सहावीत शिकणाऱ्या शेतकरी पुत्राने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

गेले काही दिवस राज्यात परतीचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन कापणीचा हंगाम सुरु आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन कापले, पण सततच्या पावसामुळे ते खराब झाले. काही सोयाबीन वाहून गेले. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. दरम्यान सहावीतील विद्यार्थी प्रताप कावरखे याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे त्याची परिस्थिती व आई वडीलांची संसाराचा गाडा चालवण्यासाठी सुरु असलेली कैफियत मांडली आहे.

प्रताप कावरखे याचे पत्र त्याच्याच शब्दात- 

एकनाथ शिंदे

मंत्री सायेब मुंबई

माये बाबा शेती करतात आमच्या घरी शेती कमी असे बाबा म्हनतात, मी बाबाले म्हणल की मले गूपचूप खायले पैसे दया कि ते माया संग भांडन करतात. म्हनतात यावर्षी सगली सोयाबीण गेले वावर इकतो देतो तूले दहा रुपये. आईन दसऱ्याले पुरणाच्या पोळ्या पण नाही केल्या. आई म्हणे इथं विष खायले पैसे नाहीत. वावरातील सोयाबीन गेले. माये बाबा दुसयाच्या कामाला जातात मी आईला म्हणल की आपल्याने दीवाली ले पोळ्या कर ती म्हणे की बॅंकेत अनुदान आलं की करू पोळ्या. सायेब आमच्या घरी सनाच्या पोळ्या नाही, मले गुपचूपसाठी पैसे नाहीत. आम्हाले घर नाही. आम्हाले काहीच नाही. मी बाबा संग भांडन केल की ती आई म्हणे आपल्या जवळच्या जयपूर गावात शेतकऱ्याले त्याच्या पोरान पेसे मागितले म्हणून त्याने फासी घेतली. आता ती बाबाले पेसे नाही मागत सायेब. आमच घर पाहा की तुम्ही, आनूदानचे पैसे लवकर दया मग दीवाळीले आई पोळ्या करते तुम्ही या पोळ्या खायले सायेब.

तुमचा आणी बाबाचा लाडका

प्रताप कावरखे
वर्ग 6 वा जी.प शाला गोरेगाव, हींगोली

महत्वाच्या बातम्या :

हिंगोली : महाराष्ट्रात राजकरण जरी जोमात सुरु असले तरी शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे उभे पिक नष्ट …

पुढे वाचा

Agriculture Maharashtra Marathi News Politics