‘चला तर मग महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कायमचा आळा घालण्यासाठी एकीची वज्रमूठ करु’

supriya sule

मुंबई : मुंबईतील साकीनाका येथील मन विषन्न करणाऱ्या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. साकीनाका येथील पीडित महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली होती. दुर्दैवाने काल या महिलेचा मृत्यू झाला असून या भयंकर घटनेमुळे सर्वच क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या आठवडाभरात बलात्काराच्या विविध घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. पुणे, मुंबई, अमरावती आणि ठाणे येथील बलात्काराचे गंभीर प्रकार आता समोर आले आहेत. याच पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कायमचा आळा घालण्यासाठी एकीची वज्रमूठ करण्याचे आवाहन केलेले आहे.

याबाबत ट्वीट करत त्या म्हणाल्या कि, ‘मुंबईतील साकीनाका येथे घडलेली महिला अत्याचाराची घटना संतापजनक आणि दुःखद आहे. अशा घटनांनंतर चर्चासत्रे होतात, राजकीय आरोप प्रत्यारोप होतात.पण आता यापुढे अशा घटना होणारच नाही यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे. हा प्रयोग महाराष्ट्रभर राबविता येणे शक्य असून पोलीसांना यासाठी विशेष प्रशिक्षण देऊन त्यांची वज्रमुठ केल्यास अशा अपराधांना कायमचा आळा घालणे शक्य होईल.

याशिवाय अशाप्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा डेटाबेस तयार करुन त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. रस्त्यावरील महिला आणि मुलांसाठी योग्य निवारा आणि पुनर्वसन यालाही प्राधान्य देणे आवश्यक आहे. महिला आणि मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना कायमचा आळा घालण्यासाठी एकीची वज्रमूठ करु.’ असे आवाहन आता सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या