मनपा निवडणूकीत समविचारी पक्षांसोबत आघाडी करु – बीआरएसपी अध्यक्ष डॉ. माने

औरंगाबाद : राज्यात सर्वत्र पक्षाचा जनाधार वाढूवून आगामी निवडणुका लक्षात घेऊन वार्ड स्तरावर पक्षबांधणी सुरू आहे. राज्यात व औरंगाबाद मनपा निवडणूक बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी समविचारी पक्षा सोबत आघाडी करून लढवेल. असे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश माने यांनी सांगितले.

जिल्ह्यातील पक्षबांधणीचा आढावा घेण्यासाठी माने हे रविवारी शहरात आले होते. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महापालिकेमध्ये शिवसेनेची गेल्या पंचवीस वर्षापासून सत्ता आहे. परंतु शहराच्या मूलभूत समस्या अद्यापही कायम आहे. त्याला शिवसेना जबाबदार आहे. परंतु ज्या पक्षाचे म्हणजे एमआयएमचे पंचवीस २५ नगरसेवक महापालिकेत होते ते सुद्धा यास जबाबदार आहे. महापालिका निवडणूक बीआरएसपी पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहे.

समाजवादी कम्युनिस्ट पार्टी या समविचारी पक्षांना सोबत घेऊन पन्नास वार्डात उमेदवार उभे केले जाणार आहे. त्यात बीआरएसपीचे पंचवीस उमेदवार असतील ओबीसीच्या आरक्षणावर बोलताना माने म्हणाले, ओबीसी आरक्षण घालवण्यास केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार आहे. ओबीसी आरक्षणाचे आकडेवारी देण्यात राज्य सरकार कमी पडले. सात महिने राज्याच्या हातात असताना राज्यांनी इम्पीरियल डाटा देण्याऐवजी केंद्राकडे बोट दाखवले. मागासवर्गीय आयोग नेमण्यातही उशीर केला. पन्नास टक्के आरक्षणाची मोदी सरकार तयार नाही त्यामुळे ओबीसी आरक्षणाला राज्य सरकार ७५ टक्के व केंद्र सरकार २५ टक्के जबाबदार असल्याचे मी मानतो. राज्य सरकारने निवडणूक पूर्वतयारीचा भाग म्हणून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था निहाय ओबीसी लोकसंख्या आकडेवारी निश्चित करावी. म्हणजे अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण वगळून ५० टक्के खालील उर्वरित राजकीय आरक्षण ओबीसी करता राबवता येईल.

या बाबतीत सरकार मधील तिन्ही पक्षांनी ओबीसी विरोधात कोणतेही राजकारण न करता त्यांना आरक्षण घोषित करण्याकरिता सबळ तयारी करून ओबीसी वरील अन्याय दूर करावा. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. मुस्लिम आरक्षणाबद्दल बोलताना ते म्हणाले पाच टक्के मुस्लिम आरक्षण कायद्याने मान्य असताना त्यावर कोणीही बोलण्यास तयार नाही. यावेळी त्यांनी राज्यातील आघाडी सरकार वरही जोरदार टीका केली. सत्तेमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे तिन्ही पक्ष राज्यातील प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरले आहे. बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. असा आरोपही त्यांनी यावेळी केला एका प्रश्नावर बोलताना डॉ माने म्हणाले, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याकडे कार्यकर्ते आहेत. परंतु त्यांच्याकडे नेत्यांची वानवा आहे. इतर रिपब्लिकन नेत्याबद्दल फारसे बोलण्याची आवश्यकता नाही. निवडणुका आल्यावर नेते जागे होतात. नेत्यांच्या अशा वागण्यामुळेच आंबेडकरी चळवळ मागे गेली आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे, मराठवाडा उपाध्यक्ष अनिल साठे, मराठवाडा संघटक प्रमुख ॲड. कपिल खिल्लारे आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या