fbpx

जाणून घ्या शहीद हेमंत करकरे कोण होते?

टीम महाराष्ट्र देशा – मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी राहिलेल्या आणि सध्या मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभेच्या जागेवरील भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुंबई हल्ल्यातील शहीद एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबाबतीत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर ही हेमंत करकरे विषयी बोलताना म्हणाल्या की, मी हेमंत करकरे यांना तुझा सर्वनाश होईल असा शाप दिला होता आणि २१ दिवसातच मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. असे तथ्यहीन वक्तव्य केल्याने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वर टीका होत आहे.

नेमकं काय म्हणाल्या साध्वी ?

‘मी म्हटलं होतं की, तुझा सर्वनाश होणार, बरोबर सव्वा महिन्यांनी सुतक लागतं. ज्या दिवशी मी आत गेले त्यावेळी सुतक लागलं. आणि बरोबर सव्वा महिन्यानंतर ज्या दिवशी दहशतवाद्यांनी त्याला (हेमंत करकरे यांना) मारलं, त्या दिवशी सुतक संपलं’, असं साध्वी यांना म्हटलं आहे. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात माझ्याविरोधात पुरावे नसतानाही हेमंत करकरेंनी हेतुपूरस्कपणे कारवाई केली, असा दावा साध्वी प्रज्ञा यांनी केला आहे.

हेमंत करकरे कोण होते?

हेमंत करकरे यांचा जन्म १२ डिसेंबर १९५४ रोजी झाला होता. १९८२ मध्ये ते आयपीएस अधिकारी झाले. महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस सहआयुक्त पद भूषवणारे करकरे हे नंतर दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख बनले.हेमंत करकरे मालेगाव साखळी बॉम्ब स्फोटाचे तपास अधिकारी होते. याच खटल्यात साध्वी प्रज्ञा आरोपी होती.

हेमंत करकरे हे दहशतवादविरोधी पथकाचे वरिष्ठ अधिकारी होते. मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाले होते. या हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे यांना भारत सरकारने अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.