मराठी तरुणांच्या नवनवीन उद्योगांना शासकीय पातळीवर मदत मिळवून देऊ : खा. संभाजीराजे

पुणे/प्रशांत झावरे : अत्याधुनिक काळाची पावलं ओळखत मराठा समाजातील तरुणांनी केलेल्या नवीन प्रयत्नाचं स्वागत आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि यासाठी पाहिजे ती मदत शासकीय पातळीवर सुद्धा उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन  खा.संभाजीराजे यांनी दिले. संभाजीराजे यांच्या हस्ते मराठा-डायल या मराठ्यांच्या स्टार्टअप उद्योगाचे उद्घाटन अण्णाभाऊ साठे सभागृह, स्वारगेट, पुणे येथे मोठ्या जल्लोषात पार पडले यावेळी ते बोलत होते.

मराठा-डायल टीमचे विजय पवार यांनी उपक्रमाची ओळख करुन दिली. प्रमुख पाहुणे श्री.प्रविणदादा गायकवाड (अध्यक्ष संभाजी ब्रिगेड) यांनी मराठा डायलच्या वाटचालीस शुभेच्छा देताना आपले दुबई, इस्राइल व इतर परदेशातील अनुभव सांगून मराठा तरुणांनी सक्रीय व आधुनिक उद्यमशीलता कशी जोपासली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्रजी कोंढरे यांनी उद्योग व्यवसाय ही काळाची गरज असून, फक्त लग्नाचीच बाजारपेठ हजारो कोटींची कशी आहे हे उलगडून सांगितले तसेच तरुणांनी सामाजिक व्यवसायिकता कशी जोपासवी याबद्दलही मोलाचे मार्गदर्शन केले. श्री.संजीव भोर (अध्यक्ष शिवप्रहार) यांनी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र आलेच पाहिजे असे आवाहन केले.

सदर कार्यक्रमासाठी युनायटेड मराठा ऑर्गनायझेशन (यूएमओ) टीमचे मोलाचे सहकार्य लाभले. दोन लाख सत्तर हजार सदस्य असणाऱ्या यूएमओ ग्रुपचे श्री.अभिनव साळुंखे यांनी ग्रुपचे सामाजिक, नौकरी, शिक्षण, शेती इ. क्षेत्रांमधील अनेक जिल्ह्यांमधे चालणाऱ्या कार्याबद्दल सांगितले, यात सहभागी होण्याचे आवाहन केले.

मराठा-डायल टीमचे श्री.विजय पवार, श्री.अभिजित काटे, श्रीमती.ज्योती गायकवाड, श्री.ज्ञानेश्वर मिरकले, श्री.उमेश नाईकवाडे, श्रीमती.प्रियंका भोर, श्री.संभाजी जठार, श्री.सचिन सोळंके यांनी उपस्थितांना मराठा-डायल संकल्पना व त्यात सामील होण्याबद्दल मार्गदर्शन केले. मराठा-डायल या ऑनलाइन बिझनेस लिस्टिंग आणि सर्विसेस प्लॅटफॉर्मची जिल्हा व तालुकवार फ्रेंचाइजी उपलब्ध असून हजारो व्यवसायक यावर नोंदणी करीत आहेत. सर्वांनी यामधे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.