शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यास मोदी सरकारला भाग पाडू- एच.के.पाटील

ahmadnagar

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- केंद्रातील मोदी सरकारने आणलेले तीन कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी आणले नसून विरोधी पक्षांचे आमदार, खासदार खरेदी करण्यास मदत करणाऱ्या उद्योपतींसाठी आणले आहेत. हे कायदे भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्राला मोडीत काढणारे आहेत.

शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यास मोदी सरकारला भाग पाडू अशी ग्वाही काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांनी दिली आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या काळ्या कायद्याविरोधात काँग्रेस पक्षाने काल महाव्हर्च्युअल रॅली आयोजित केली होती. संगमनेर येथील मुख्य कार्यक्रमात एच.के.पाटील बोलत होते.

एच.के.पाटील पुढे म्हणाले की, या कायद्यामुळे काँग्रेसने उभी केलेली बाजार समिती व्यवस्था संपुष्टात आणून साठेबाजी, काळा बाजार करणाऱ्यांना मोकळे रान मिळणार आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून शेतकरी विरोधी भूमिका घेत आले आहेत.

बिहारमध्ये २००६ मध्ये हा कायदा लागू केला होता, तेथे तो अपयशी ठरलेला असतानाही फक्त उद्योगपतींच्या हितासाठी तो देशभरात लागू करण्याचा त्यांचा डाव आहे. या कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा पेटून उठला आहे. काँग्रेस पक्ष हा शेतकरी, कामगारांसाठी लढत आहे. आपणही पेटून उठले पाहिजे. तसेच शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यास मोदी सरकारला भाग पाडणार असल्याचे एच.के.पाटील यांनी सांगितले.

महाव्हर्च्युअल रॅलीच्या संगमनेर येथील झालेल्या मुख्य कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, राज्यसभा खासदार राजीव सातव, आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव वामसी चांद रेड्डी, आशिष दुआ, बी.एम.संदीप, युवक काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, मोहन जोशी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.