सामान्य माणसाची कथा मांडणारा लेथ जोशी

blank

 टीम महाराष्ट्र देशा : मंगेश जोशी दिग्दर्शित या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. पुण्यापासून ते सिंगापूरपर्यंत वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवात सिनेमाची ‘लेथ जोशी’ गाजला आहे. या सिनेमात चित्तरंजन गिरी यांनी लेथ जोशी यांची भूमिका साकारली आहे. त्यांच्यासह अश्विनी गिरी, ओम भुतकर, सेवा चौहान या सर्वच कलाकारांनी अफलातून अभिनय केला आहे. या चित्रपटाचं पार्श्वसंगीत व संकलन काबील-ए-तारीफा यांनी दिलंं आहे.

मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील एक मशीन म्हणजे लेथ. माणूस आणि मशीनच्या प्रेमाची गोष्ट तसंच त्या अनुषंगानं घडलेला बदल मांडणारा हा चित्रपट आहे. तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे, काळ फार बदलला आहे असे आपल्याला सतत ऐकायला मिळते. पण या काळाप्रमाणे आपण देखील आपल्यात बदल करण्याची गरज आहे. काळाच्या बरोबर आपण चाललो नाही तर आपण तिथेच अडकून पडतो आणि काही काळाने लोक आपल्याला विसरायला देखील लागतात हे सांगणारा लेथ जोशी हा चित्रपट आहे.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच लेथ जोशी (चित्तरंजन गिरी) यांची कंपनी बंद पडल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी जवळजवळ ३५ वर्षं तिथे काम केलेले असते. त्यामुळे त्या वास्तूशी आणि विशेषतः ते ज्या मशिनवर काम करत असतात, त्याच्याविषयी त्यांना एक वेगळीच आपुलकी असते. त्यांच्या घरात त्यांची पत्नी (अश्विनी गिरी), मुलगा दिनू (ओम भुतकर) आणि आई (सेवा चौहान) असते. त्यांची पत्नी जेवणाच्या ऑर्डर घेत असते तर दिनू कॉम्प्यूटर रिपेअरचे काम करत असतो. ते दोघेही आपापल्या व्यवसायात प्रगती करत असतात तर दुसरीकडे नोकरी गेल्यानंतर देखील लेथ जोशी यांचा जीव त्यांच्या मशिनमध्येच अडकलेला असतो. ती मशिन विकत घेऊन आपण आपला नव्याने व्यवसाय सुरू करावा असे त्यांना वाटत असते. लेथ जोशी यांची ही इच्छा पूर्ण होते का? त्यांच्या आयुष्यात काय काय घडते हे प्रेक्षकांना लेथ जोशी या चित्रपटात पाहायला मिळते.

काळाप्रमाणे तंत्रज्ञान सतत बदलत असते. अनेक ठिकाणी कामगारांची जागा आता मशिनने घेतली आहे. त्यामुळे अनेक कुशल कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. पण या सगळ्यात देखील नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्यात बदल घडवणारे लोक प्रगती करतात हे आपल्याला आजूबाजूलाच पाहायला मिळते. हीच आपल्या रोजच्या आयुष्यातील गोष्ट दिग्दर्शक मंगेश जोशीने खूप छानपणे मांडली आहे. चित्रपटात चित्तरंजन गिरी, अश्विनी गिरी, ओम भुतकर यांनी खूपच छान अभिनय केला आहे. लेथ जोशी यांची नोकरी गेल्यानंतर त्यांची होत असलेली घालमेल चित्तरंजन गिरी यांनी देहबोलीतून उत्तमरित्या सादर केली आहे. लेथ जोशी यांच्या आईच्या भूमिकेत असलेल्या सेवा चौहान तर विशेष लक्षात राहातात. या चित्रपटाचा वेग हा फारच संथ असला तरी हा चित्रपट कुठेच कंटाळवाणा वाटत नाही.

या चित्रपटात अनेक गोष्टी दिग्दर्शकाने उलगडून सांगितलेल्या नाहीत. पण चित्रपट पाहताना एक प्रेक्षक म्हणून त्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उलगडतात, हेच या चित्रपटाचे यश आहे. तसेच चित्रपटात अनेक दृश्यांमध्ये संवाद नाहीयेत. पण तरीही कलाकारांच्या देहबोलीतून, एकंदर वातावरणातून दिग्दर्शकाला काय सांगायचे आहे हे आपल्याला लगेचच कळते. चित्रपटाचे पार्श्वसंगीत, सिनेमेटॉग्राफी देखील मस्त जमून आली आहे. केवळ चित्रपटाच्या एडिटिंगमध्ये काहीशा त्रुटी जाणवतात. एकंदरीत हा लेथ जोशी प्रेक्षकांना नक्कीच भावतो.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचं ‘संत तुकाराम’ पारितोषिक मिळवणारा यंदाच्या वर्षीचा सिनेमा म्हणजे ‘लेथ जोशी’ या सिनेमाच्या दिग्दर्शकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा नुकताच खोवला गेला आहे. या सिनेमानं सिंगापूर, साउथ एशियन चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट चित्रपटाचं प्रथम पारितोषिक पटकावलं आहे.या सिनेमाची निवड आत्तापर्यंत १७ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली असून, तो एकूण नऊ पुरस्कारांनी गौरवला गेला आहे. रशियाच्या १३व्या कझान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक मंगेश जोशी यांना उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. लिफ्ट इंडिया फिल्मोत्सवामध्ये या चित्रपटानं फक्त उत्कृष्ट चित्रपटच नाही, तर दिग्दर्शन आणि सहाय्यक अभिनेत्री (अश्विनी गिरी) असे एकूण तीन पुरस्कार मिळवले. पिफनंतर बंगळुरूत झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपटानं विशेष परीक्षक निवडीचा सन्मानही मिळवला.

ऑस्ट्रेलिया हा खंड वगळता इतर सगळ्या खंडांत हा चित्रपट दाखवण्यात आला आहे. रशियात रशियन उपशीर्षकांसह हा चित्रपट दाखवण्यात आला. ऑक्टोबर महिन्यात ब्राझीलमध्ये होणाऱ्या ४१ व्या साओ पाउलो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात न्यू डिरेक्टर कॉम्पिटिशन विभागात आणि बार्सिलोना इथं होणाऱ्या कास आशिया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पर्धा विभागात या चित्रपटाची निवड झाली आहे.

नागराज मंजुळे आठवलेंच्या जीवनावर चित्रपट बनवणार

‘शुभ लग्न सावधान’,चाहत्यांनी लग्नपत्रिका पाहिली का ?

ग्लॅमरस दुनियेची सफर ‘परी हुँ मैं’ या मराठी चित्रपटातून घडणार