आमदार झाल्यासारखं वाटतय : कोथरूडमध्ये उमेदवारीसाठी भाजपात चढाओढ तर इतरांना हवाय सक्षम चेहरा

विरेश आंधळकर : पुणे शहरातील सर्वात जलद गतीने विकसित झालेला परिसर म्हणून कोथरूडला ओळखले जाते. २००८ पर्यंत या भागाचा समावेश शिवाजीनगर मतदारसंघात होता. पुढे परिसीमनमध्ये शहरात नव्याने अस्तित्वात आलेल्या मतदारसंघापैकी कोथरूडची भर पडली. बाणेर, बालेवाडी पाषाण, रामबाग कॉलनी, शिवतीर्थनगर, मयूर कॉलनी डहाणूकर कॉलनी, एरंडवणे, हॅप्पी कॉलनी, कर्वेनगर, तसेच बावधन आणि कोथरूड डेपोचा काही भाग या मतदारसंघात समाविष्ट आहे. शिवाजीनगर आणि पुढे कोथरूडमध्ये देखील शिवसेना – भाजप युतीचे प्राबल्य राहिलेले आहे.

२००८ मध्ये युतीच्या जागा वाटपात कोथरूडमध्ये शिवसेना तर आघाडीकडून राष्ट्रवादीने लढत दिली. तर नवख्या मनसेने येथे आपली ताकद दाखवून दिली होती. शिवसेनेकडून चंद्रकांत मोकाटे, राष्ट्रवादीकडून अण्णा जोशी, मनसेचे किशोर शिंदे, अपक्ष कॉंग्रेस बंडखोर दीपक मानकर आणि भाजप बंडखोर उज्वल केसकर यांनी लढत दिली. यामध्ये चंद्रकांत मोकाटे यांचा आठ हजार मतांनी विजय झाला होता. मनसेचे किशोर शिंदे हे ४४ हजार मते घेत दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. २०१४ मध्ये आघाडी आणि युतीमध्ये बिघाडी झाल्याने सर्व पक्ष स्वतंत्र लढले. यामध्ये मोदी लाट आणि जातीय समीकरणाच्या जोरावर भाजप उमेदवार मेधा कुलकर्णी यांनी तब्बल १ लाख मते घेत विजय मिळवला.

Loading...

कोथरूडचा परिसर विकसित आणि कॉस्मोपॉलिटियन मानला जातो. मागील काळात झालेल्या लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीमध्ये येथील मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढल्याने इतर पक्षांना अस्तित्वासाठी झगडावं लागताना दिसत आहे. २०१९ साठी विद्यमान आ. मेधा कुलकर्णी यांची भाजप उमेदवारीसाठी प्रमुख दावेदारी असणार आहे. मागील चार वर्षामध्ये त्यांची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. मात्र कुलकर्णी यांनी मराठा आंदोलन, ब्राम्हण समाज, गडकरी पुतळ्या संदर्भात केलेली वादग्रस्त विधाने स्वतः त्यांना आणि पक्षाला देखील डोकेदुखी ठरू शकतात.

कधी नव्हे ते भाजपकडे शहरातील सर्व सत्ता असल्याने सहाजिकच प्रत्येक कार्यकर्त्याला सत्तेची चव चाखायची आहे. महापालिकेत नगरसेवक बनलेल्या अनेकांना विधानसभा खुणावतेय. यामध्ये २०१४ साली पक्षांतर्गत कुरघोडीचा फटका बसल्याने उमेदवारीपासून वंचित राहिलेले मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर आहेत. मोहोळ यांना पालिकेत मिळालेल्या स्थायी समिती अध्यक्षपदामुळे बळ मिळाले आहे. आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. पुण्यातील बहुचर्चित दुमजली उड्डाणपुलाच्या भूमिपूजनावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या साक्षीने मोहोळ यांनी आपली ताकद दाखवून दिली. त्यामुळे मोहोळ देखील भाजप उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहेत.

दुसरीकडे आ. कुलकर्णी आणि मोहोळ यांच्यासोबतीने बाणेर – बालेवाडीचे नगरसेवक अमोल बालवडकर हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. आगामी काळात आणखीन काही नावे पुढे येवू शकतात. त्यामुळे उमेदवारी देताना भाजपची डोकेदुखी ठरणार आहे. तसेच बंडखोरीची शक्यता देखील नाकारता येत नाही.

जुन्या फाॅॅर्मुल्यानुसार युती झाल्यास कोथरूडवर शिवसेना दावा करू शकते. मात्र भाजपसोबत अथवा भाजपविना लढण्यासाठी शिवसेनेने जोरदार तयारी सुरु केली आहे. शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे प्रमुख दावेदार आहेत. माजी नगरसेवक शाम देशपांडे, विद्यमान नगरसेवक पृथ्वीराज सुतार हे देखील उमेदवारीच्या रेसमध्ये आहेत. सेनेच्या तिन्ही दावेदारांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. पक्षाकडूनप्रबळ दावेदार असणारे नगरसेवक दीपक मानकर हे सध्या जेलमध्ये आहेत. त्यामुळे बाबुराव चांदेरे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र पालिका निवडणुकीत पक्षाला विशेष कामगिरी करता आली नसल्याने राष्ट्रवादीला विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे. मनसेची ताकद असणारा मतदारसंघ म्हणून कोथरूडला ओळखले जात असले तरी नजीकच्या काळातील निवडणुकांत पक्षाची सुमार कामगिरी राहिली आहे. इतर पक्षांप्रमाणे मनसेलाही येथे अंतर्गत दुफळीचे ग्रहण लागलेले आहे. मनसेकडून माजी नगरसेवक किशोर शिंदे प्रमुख दावेदार आहेत.

प्रमुख पक्षांच्या सोबतीने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील इतर नावे देखील चर्चेत आहेत. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते आशिष कांटे यांचे नाव आघाडीवर आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने कांटे यांनी कोथरूड परिसरात फ्लेक्स आणि हजारो युवकांच्या साक्षीने कार्यक्रम घेत आपली ताकद दाखवून दिली. मात्र गर्दीचे रुपांतर मतांमध्ये करण्यात त्यांना कितपत यश येईल हा प्रश्न आहे. शेवटी हि सर्व भविष्यातील गणिते असल्याने तूर्तास तरी प्रत्येक इच्छुकांला आमदार झाल्यासारखं वाटतंय, हेच म्हणावे लागेल.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
राष्ट्रवादी-मनसेचे कार्यकर्ते भिडले