fbpx

अन् पालकमंञी संभाजीराव पाटील निलंगेकरांनी दिला शेतक-यांना दिलासा !

निलंगा/प्रा.प्रदीप मुरमे – लातूर जिल्ह्यातील ‘लातूर-जहिराबाद’ या राष्ट्रीय महामार्गाची रुंदी २४ मीटरवरुन ३० मीटर करण्यास मान्यता देण्यात येत असून या अतिरिक्त ६ मीटर जमिनीचा मावेजा संबंधित शेतक-यांना मिळण्यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करु अशी ग्वाही देत पालकमंञी पाटील यांनी जिल्ह्यातील शेतक-यांना मोठा दिलासा दिला आहे.

निलंगा येथील उपविभागीय कार्यालयात राष्ट्रीय महामार्गाच्या विकासकामाबाबत संबंधित ग्रामस्थ,शेतकरी व अधिकारी यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने,बांधकाम विभाचे अधीक्षक अभियंता अनिल कुलकर्णी,कार्यकारी अभियंता बाबासाहेब थोरात,राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता अभंगे,कार्यकारी अभियंता एम.एम.पाटील, तहसीलदार विक्रम देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.मागील एक वर्षापासून या रस्त्याचे काम चालू आहे. परंतु शासनाकडून संबंधित शेतक-यांना मावेजा देण्यात आला नाही.

परिणामी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याबाबत शासनाकडे वेळोवेळी निवेदने दिली.दरम्यान शासनाकडून काहीच दखल घेण्यात न आल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक होत वेळोवेळी आंदोलन केल्याने अनेक शेतक-यांवरती पोलिसात गुन्हे दाखल झाले. गुन्हे दाखल झाल्यानंतर जामिन घेण्यास नकार देत शेतकऱ्यांनी आपला तीव्र असंतोष व्यक्त केला. आपल्या जमिनीला मावेजा मिळावा या न्याय मागणीसाठी जिल्हातील शेतकरी आक्रमक झाले असून शासनाच्या विरोधात आपल्या संतप्त भावना व्यक्त करत असल्याचे वेळीच ओळखून जिल्ह्याचे पालकमंञी निलंगेकर यांनी शुक्रवारी येथील उपविभागीय कार्यालयात या रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित शेतक-यांशी संवाद साधून त्यांच्या नेमक्या भावना जाणून घेतल्या.या बैठकीत शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार महामार्गालगत सर्व्हिस रोड व भुयारी मार्ग तयार करण्यासाठी या महामार्गाची रुंदी २४ मीटर वरुन ३० मीटर करण्यास मान्यता देण्यात येत असून या अतिरिक्त ६ मीटर जमिनीचा मावेजा संबंधित शेतक-यांना मिळण्यासाठी पालकमंञी या नात्याने आपण बांधील आहोत असे सांगत मावेजासाठी आक्रमक झालेल्या शेतक-यांना आश्वस्त केले.

या महामार्गाच्या अतिरिक्त जमिन संपादनाचे काम प्रशासनाने तात्काळ सुरु करावे अशा प्रशासनास सूचना देवून महामार्गालगतच्या गावांना व तेथील शेतकरी यांच्या अडचणी चर्चेतून सोडविल्या जातील असा शब्द शेतक-यांना दिला. महामार्गाच्या या विकासकामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन मंञीमहोदयांनी यावेळी केले. पालकमंञी यांनी आपल्या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतल्यामुळे अनेक संबंधित शेतकऱ्यांनी पालकमंञी संभाजीराव पाटील यांच्याबाबतीत समाधान व्यक्त केले.