सर्वसामान्य नागरिकांना प्लास्टिक बंदीचा दंड कराल, तर गाठ ‘मनसेशी ’

पुणे : मनसेने आज पुणे महानगरपालिका येथे प्लास्टिक व थर्माकोल बंदीच्या आडून सर्व सामान्य व व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याच्या कृतीला विरोध करणारे घोषणा देत आंदोलन केले.

प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी घालत प्लास्टिकची पिशवी सापडल्यास ५००० ते २५००० दंड करण्याच्या कृतीच्या विरोधात सर्व सामान्य नागरिकामंध्ये व व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आज व्यापाऱ्यांनी बंद पुकारून भाजप-सेना सरकारच्या विरोधातला असंतोष दाखवून दिला. मनसेचे महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेत आज दु. ४ वाजता घुसले व प्लास्टिकच्या बाटल्या वाजवत दंड वसुलीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. उपायुक्त, सुरेश जगताप यांच्या दालनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांना प्लास्टिकच्या पिशव्या घनकचरा व्यवस्थापन कार्यालयात आढळून आल्या. यानंतर मनसेने घोषणाबाजी करत महानगरपालिकेमध्ये फेरी मारली व अतिरिक्त आयुक्त, निबाळकर यांना घेराव घातला. यावेळी सर्व सामान्य नागरिकांवर कारवाई कराल तर मनपा अधिकाऱ्यांना मनसे स्टाईल जाब विचारला जाईल हे लक्षात ठेवा हा इशारा देण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मा. मुख्यमंत्री व मा. पर्यावरण मंत्री यांना दि. २७/०४/२०१८ रोजी पत्र देत सर्व सामान्य व्यापाऱ्यांना वेठीस धरू नका, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनांच्या पिशव्यांवर पहिल्या कारवाई करा अशी मागणी केली होती.

आजच्या आंदोलनात मनसेचे बाळा शेडगे, राम बोरकर, जयराज लांडगे, हेमंत बत्ते, प्रशांत मते, आशिष देवधर, राहुल गवळी, सुधीर धावडे, प्रशांत कनोजिया, विद्यार्थी सेनेचे विक्रांत अमराळे, अमोल शिंदे महिला आघाडीच्या रुपाली पाटील, सुरेखा होले, जयश्री पाथरकर, लावण्या शिंदे, वाहतूक सेनेचे गणेश नायकवडे, आदींसहित शेकडो मनसैनिक उपस्थित होते.

दरम्यान,प्लास्टिक बंदीच्या विरोधात आज पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारा जवळ पुण्यातील व्यापाऱ्यांनीही आंदोलन केले. प्लस्टिक बंदीचे व्यापाऱ्यांनी स्वागत केले मात्र जाचक अटी रद्द करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली. दंडाच्या नावाखाली 5000 हजार रुपये वसूल केले जात आहेत यामुळे वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांची चंगळ होत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला.

प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास मंगळवारपासून (26 जून) व्यापारी बेमुदत बंद पुकारणार असल्याची माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.शहरातील कोथरुड, वारजे माळवाडी, सिंहगड रस्ता, कात्रज, बिबवेवाडी, सहकारनगर, सर्व पेठ भाग, गोखलेनगर, वडगावशेरी, चंदननगर आदी उपनगरातील व्यापारी संघटनांच्या रिटेल व्यापारी प्रतिनिधींची रविवारी बैठक झाली. यामध्ये सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे.

3 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...