“मला तिकीट देऊन न्याय द्यायचा की, अन्याय करायचा हे शरद पवार यांनीच ठरवावे”

sharad-pawar

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी पक्षाकडून तिकीट देऊन न्याय द्यायचा की, अन्याय करायचा, हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच ठरवावे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले . आघाडीच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत माने गटावर अन्यायच होत आला असल्याचा आरोप देखील माने यांनी केला.

शिवजयंतीनिमित्त येथील दलितमित्र काकासाहेब माने इचलकरंजी नगरपालिका नोकरांची को-ऑप. क्रेडिट सोसायटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण माजी खासदार श्रीमती निवेदिता माने व धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नेमकं काय म्हणाले धैर्यशील माने?
गतवेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जागा काँग्रेससाठी राष्ट्रवादीने सोडली होती. त्यावेळी पक्षाने आम्हाला आश्वासन दिले होते. मात्र, आजपर्यंत अन्यायच होत आला आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून तिकीट देऊन न्याय द्यायचा की, अन्याय करायचा, हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच ठरवावे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यावर आपण ठाम आहोत.