शालेय अभ्यासक्रमात बाल गुन्हेगारी कायद्याविषयी धडे घेण्याबाबत विचार करण्यात येईल

devendra fadnavis

मुंबई, दि. 7 : मुलांना बाल गुन्हेगारी कायद्याची माहिती व्हावी व ती गुन्हेगारीकडे वळू नयेत यासाठी शालेय अभ्यासक्रमात बाल गुन्हेगारी कायद्याविषयी धडे समाविष्ट करण्याबाबत शिक्षण विभागाला कळविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

विधानपरिषदेमध्ये सदस्य विद्या चव्हाण यांनी बाल गुन्हेगारी विषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले, मुले गुन्हेगारीकडे वळू नये यासाठी त्यांना राष्ट्रीय मुल्यांचे शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. राज्यात बाल गुन्हेगार मुलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक असे 35 बाल न्याय मंडळे व सर्व जिल्ह्यांमध्ये बाल कल्याण समिती गठित करण्यात आली आहे. सर्व पोलीस स्थानकात विशेष बाल पथक स्थापन करण्यात आले आहे. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत जुलै 2015 ते जुलै 2017 या कालावधीत 20 हजार 112 बालकांना त्यांच्या घरी पोहोचविण्याचे काम केले आहे. 18 वर्ष पूर्ण झालेल्या बाल सुधारगृहातून बाहेर आलेल्या मुलांचे स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने पुनर्वसनाचा प्रयत्न केला जाईल. या मुलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याबाबतचा आराखडा तयार करण्यात येत आहे. अनाथ विद्यार्थी गुन्हेगारी क्षेत्राकडे वळणार नाही यासाठी प्रयत्न केले जात आहेत, चाईल्ड एड सोसायटी कार्यरत आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईत पोलीसांची ड्युटी आठ तास केली आहे. राज्यात इतरही ठिकाणी याबाबत काय करता येईल याचा विचार करु,  असे या चर्चेतील उप प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सर्वश्री हेमंत टकले, शरद रणपिसे, भाई जगताप, ॲड.सुनील परब, जयंत पाटील, अनिल तटकरे, श्रीमती हुस्नबानो खलिफे या सदस्यांनी सहभाग घेतला.