लेनिन, पेरियारनंतर श्यामा प्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याची विटंबना

पुतळ्यांच्या विटंबनेचा वाद मिटता मिटेना,अमित शहांनी भाजप कार्यकर्त्यांना खडसावलं.

कोलकाता : त्रिपुरामध्ये लेनिनच्या पुतळ्याची नासधूस केल्याचे पडसाद तामिळनाडूनंतर आता पश्चिम बंगालमध्येही उमटताना दिसत आहेत. कोलकातामधील कालीघाट परिसरात जनसंघांचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याला काळं फासण्यात आलं.इतकंच नाही तर हा पुतळा उखडून टाकण्याचाही प्रयत्न झाला.कालीघाट परिसरातील केवायसी पार्कमध्ये असलेल्या या पुतळ्याला आज सकाळी आठच्या सुमारास काळं फासण्यात आलं.

तामिळनाडूतही ई.व्ही रामस्वामी अर्थात पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आलीये. तामिळनाडूच्या वेल्लोर तालुक्यात ही घटना घडलीये. या पुतळ्याचं नाक आणि चष्म्याची तोडफोड करण्यात आलीये, अशी माहिती पोलिसांनी दिलीये. रात्री ९ वाजण्याच्या सुमाराला हा पुतळा जाळण्यात आलाय. तोडफोड करणाऱ्या दोघांना स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय.

lenin-tripura

परवा त्रिपुरामध्ये दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील बेलोनियामध्ये रशियन राज्यक्रांतीचा प्रणेता व्लादिमीर लेनिनचा पुतळा भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुलडोझरच्या मदतीने तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत भाजप समर्थकांनी अक्षरशः धुडगूस घातला.

दरम्यान भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पुतळ्यांच्या तोडफोडी संदर्भात ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावर त्यांनी तीव्र नाराजी दर्शवली असून पुतळ्यांच्या तोडफोडी प्रकरणी भाजपच्या एकाही कार्यकर्त्याचा संबंध असल्यास अथवा निदर्शनास आल्यावर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अमित शहा यांनी दिला आहे.