बॉलिवूडच्या हवाहवाईची मनाला चटका लावणारी एक्झिट

टीम महाराष्ट्र देशा: अभिनय आणि नृत्यानं लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं आहे. कार्डिअॅक अरेस्टने श्रीदेवी यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी श्रीदेवी यांनी घेतलेली एक्झिट बॉलिवूडसह तमाम चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली.

श्रीदेवी आपल्या कुटुंबीयांसह दुबईत मोहित मारवाहच्या लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. शनिवारी रात्री ११-११.३० वाजताच्या सुमारास कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं. यावेळी पती बोनी कपूर आणि धाकटी मुलगी खुशी त्यांच्यासोबत दुबईत होते, तर मोठी मुलगी जान्हवी मुंबईत होती.

श्रीदेवी यांना बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार मानलं जातं. श्री अम्मा यंगर अय्यपन म्हणजेच श्रीदेवी यांचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ रोजी झाला. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्ल्याळम चित्रपटातही अभिनय केला आहे.