नागपूर विद्यापीठाची ‘व्हॉट्स अॅप’ अॅडमिनला कायदेशीर नोटीस

Nagpur university (2)q

नागपूर: नसते वाद ओढावून घेण्याची सवय जडलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने आणखी एक अफलातून प्रकार केला आहे. विद्यापीठाच्या काही अधिका-यांनी ‘आरटीएमएनयु-ए’ नावाने सुरू असलेल्या व्हॉटस् अॅप ग्रुपच्या नावावर आक्षेप धेऊन चक्क गृप अॅडमिन असलेल्या महेंद्र निंबार्ते यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने आयोजित स्नेहभोज कार्यक्रमात आलेल्या दोन प्राध्यापकांनाही विद्यापीठाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे अफलातून प्रकार करणा-या विद्यापीठाच्या अधिका-यांना नेमके झाले तरी काय, असा प्रश्न शिक्षण वर्तुळात चर्चेला आला आहे.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य महेंद्र निंबर्ते यांनी ‘आरटीएमएनयू-ए’ या नावाचा ‘व्हॉट्सअॅप  ग्रुप’ तयार केला आहे. या ‘ग्रुप’चे ‘आयकॉन’ म्हणून नागपूर विद्यापीठाच्या इमारतीचे चित्र लावले होते. यात शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, अधिकारी तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. विद्यापीठासह समाजातील विविध घडामोडींवर येथे मतमतांतरे व्यक्त करण्यात येतात. मात्र ३ दिवसांपूर्वी महेंद्र निंबर्ते यांना धक्काच बसला. त्यांच्या भंडारा येथील निवासस्थानी कायदेशीर नोटीशीचे पत्र आले. विद्यापीठाच्या वतीने महेंद्र लिमये यांनी ही नोटीस पाठविली होती. आमचे पक्षकार विदर्भातील नामांकित विद्यापीठ असून याला ‘आरटीएमएनयू’ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी) असे ओळखल्या जाते. मात्र याच नावाचा उपयोग करुन तयार झालेल्या’व्हॉट्सअॅप  ग्रुप’ ग्रुप’मुळे संभ्रम निर्माण झाला असून हा विद्यापीठाचा अधिकृत ‘ग्रुप’ आहे की काय, अशी शंका अनेक सदस्यांच्या मनात उपस्थित होत आहे. त्यामुळे या ‘ग्रुप’चे नाव बदलण्यात यावे व विद्यापीठाचे छायाचित्रदेखील 3 दिवसांत हटवावे, असे नोटीसीच्या माध्यमातून बजाविण्यात आले.

ही नोटीस प्राप्त होताच विद्यापीठ वर्तुळातदेखील खळबळ उडाली. अशाप्रकारे ‘व्हॉट्सअॅप  ग्रुप’अॅडमिन’ला विद्यापीठाने नोटीस देण्याची ही पहिलीच घटना आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनिल मिश्रा हेदेखील या ‘ग्रुप’चे सदस्य आहेत. मिश्रा या ‘ग्रुप’मध्ये विद्यापीठ आणि अधिका-यांची मानहानी करणारे व तथ्यहीन ‘पोस्ट’ करतात. यामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे सुनिल मिश्रा यांनादेखील ‘व्हॉट्सअॅप ‘मधून काढण्यात यावे. जर 3 दिवसांत असे झाले नाही तर विद्यापीठाकडून फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यासंदर्भात पावले उचलण्यात येतील, असा इशारा या नोटीशीच्या माध्यमातून निंबर्ते यांना देण्यात आला आहे.