कोरेगाव-भीमा दंगल: डाव्या नेत्यांची नागपुरात 18 फेब्रुवारी रोजी निषेध सभा

Umar_Khalid_and_Jignesh_Mewani

नागपूर- कोरेगाव-भीमा आणि दक्षिणायनच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात एल्गार पुकारणा-या डाव्या नेत्यांनी नागपुरात येत्या 18 फेब्रुवारी रोजी निषेध सभेचे आयोजन केले आहे. या सभेला जिग्नेश मेवाणी, उमर खालिद आणि कन्हय्याकुमार उपस्थित राहणार असून रिपब्लिकन नेते रामदास आठवले आणि माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांना या सभेपासून लांब ठेवण्यात आले आहे. त्यामुळे डाव्या नेत्यांनी रिपब्लिकन व्यासपीठ बळकावल्याचे चित्र आहे.

पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ व संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्या अटकेच्या मागणीसाठी येत्या 18 फेब्रुवारीला नागपुरातील इंदोरा भागात निषेध सभा आयोजित केली आहे. दिनेश गोडघाटे व हरीदास टेंभुर्णे ही सभा आयोजित केली आहे. या सभेला गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी, विद्यार्थी नेते उमर खालिद व कन्हैय्या कुमार उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी सर्व रिपब्लिकन नेत्यांना निमंत्रित केले जाणार आहे. यातून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले व बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्ष व माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांना मात्र वगळण्यात आले आहे.

जिग्नेश मेवानी व उमर खालिदच्या पुणे येथील सभेवरून वाद निर्माण झाला होता. पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारली होती. आता मुख्यमंत्र्यांच्या शहरात हे तिन्ही युवा नेते भाजपवर टीकास्त्र सोडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या सभेबद्दल राजकीय वर्तुळाच चर्चेला उधाण आले आहे.Loading…
Loading...