एलईडी बल्बचे होणार खंडाळ्यात उत्पादन

मुंबई – देशात प्रथमच एलईडी बल्बचे उत्पादन करण्यासाठी राज्य सरकारसोबत सिस्का कंपनीने करार केला असून, हा कारखाना खंडाळा तालुक्‍यातील केसुर्डी येथे उभारण्यात येणार असल्याची माहिती उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांनी दिली.

चाकण आणि खंडाळा या दोन्ही ठिकाणी मिळून 1000 कोटी रुपये खर्चाचे उत्पादन प्रकल्प उभे राहणार आहेत. नव्याने आलेली एक हजार 15 कोटी रुपयांची गुंतवणूक ही “मेक इन महाराष्ट्र‘ मोहिमेचे यश मानले जाते. या दोन्ही प्रकल्पांसाठी भूखंड वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. एलईडी बल्बच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेली सिस्का ही जपानी कंपनी केसुर्डी येथे 200 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार आहे.

या प्रकल्पासाठी 15 एकर जमीन राज्य शासनाकडून देण्यात आली आहे. प्रकल्पाची उभारणी एक ते दोन वर्षांत पूर्ण होणार असून, यातून 200 नवीन रोजगार निर्माण असल्याची माहिती चंद्रा यांनी दिली.