औरंगाबादसह हिंगोली मधील म्हाडाच्या सदनिकांची गुरूवारी ऑनलाईन सोडत

औरंगाबाद : म्हाडाच्या सदनिकांसाठी विविध उत्पन्न गटांतील एकूण ८६४ सदनिकांसाठी पात्र अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्यास अनुसरून एकूण ८ हजार २२६ अर्ज प्राप्त झालेले आहेत. सदरील योजनेची सोडत ओएससी समिती सदस्यांच्या समक्ष १० जून रोजी दुपारी एक वाजता औरंगाबाद म्हाडा कार्यालयातर्फे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ऑनलाईन उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असल्याचे म्हाडाचे मुख्य अधिकारी अ. मा. शिंदे यांनी कळवले आहे.

औरंगाबाद मंडळातर्फे हिंगोली येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १३२, म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत अल्प उत्पन्न गटातील ४८, पडेगाव-औरंगाबाद येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३६८ सदनिका व म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत मध्यम उत्पन्न गटातील १६८ सदनिका व औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील २० टक्के सर्व समावेश योजनेंतर्गत मध्यम उत्पन्न गटातील १४८ सदनिका अशा विविध उत्पन्न गटांतील एकूण ८६४ सदनिकांची सोडत होणार आहे.

कोविड -१९ महामारीच्या प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेता व शासनाने ठरवून दिलेल्या धोरणानुसार सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास असलेल्या निर्बंधास अनुसरून म्हाडा कार्यालयात लॉटरीसाठी कोणाही अर्जदारास प्रवेश देण्यात येणार नाही. सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. अर्जदारांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर थेट प्रक्षेपणाची लिंक पाठविण्यात येणार आहे. लिंकव्दारे विहित वेळेत ऑनलाईन लॉटरी सोडत पाहता येईल. सोडतीच्या दिवशी सोडतीमध्ये यशस्वी अर्जदार व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची यादी म्हाडा कार्यालयातील सूचना फलकावर, म्हाडाच्या संकेतस्थळावर सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध करण्यात येईल. प्रतीक्षा यादीवरील अर्जदार व अयशस्वी अर्जदारांना अनामत रकमेचा परतावा त्यांनी दिलेल्या बँक खात्यावर २४ जूनपर्यंत करण्यात येणार आहे, असेही त्यांनी कळवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या