व्यसनमुक्तीचे राहू द्या, कर्जमाफी कधी ते सांगा

BJP minister Subhash Deshmukh

सोलापूर : रस्ता झाला सभामंडपाचे उद्घाटन केले. पण गाव व्यसनमुक्त करण्याचा मला दिलेला शब्द तुम्ही कधी पूर्ण करणार?’ असा प्रश्न सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी टाकळी ग्रामस्थांना केला. तेव्हा समोर उपस्थित जेटाप्पा कुंभार यांनी ‘व्यसनमुक्तीचं राहू द्या, अगोदर कर्जमाफी कधी होणार? ते सांगा.’ असा उलट जाब विचारला.

या प्रतिप्रश्नामुळे संतापलेल्या देशमुखांनी ‘दहा वर्षांनी कर्जमाफी करू,’ असे सांगत त्यास चांगलेच धारेवर धरले. टाकळी येथील कार्यक्रमात हा प्रकार घडला. या वेळी संतापलेले देशमुख म्हणाले, ‘गेल्या ७० वर्षांत गोरगरीब शेतकऱ्यांची वाट लागली. अनेकांच्या घरादारावर नांगर फिरला. तुम्ही मला जाब विचारता. आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत, असे सांगत त्यांनी गाव व्यसनमुक्त झाल्यास तुमचाच फायदा आहे. माझा काही यात स्वार्थ नाही.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी शेतीच्या विकासाचे धोरण राबवत आहेत. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप सरकार कटिबद्ध आहे. पण तुमच्यासारख्या पिणाऱ्यांमुळे गावाचे वाटोळे होते. गावाचा विकास करायचा असेल तर अगोदर व्यसनाला दूर ठेवा. गट-तट जातीवादाला थारा देऊ नका.

मंत्री देशमुख यांना जाब विचारता पोलिसांनी कुंभार यास वेढा घातला. काहीजण त्यास गप्प बसवण्याचा प्रयत्न करत होते. सहकारमंत्री देशमुख यांनी रविवारी आपल्या दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा दौरा केला. या वेळी त्यांनी आहेरवाडी येथे कृषी विभागाच्या कामाचा प्रारंभ केला.

टाकळीत सभामंडप जिल्हा विकास निधीतून झालेल्या नवीन टाकळीस जोडणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन केले. या वेळी सभापती ताराबाई पाटील, उपसभापती संदीप टेळे, रामप्पा चिवडशेट्टी, शशिकांत दुपारगुडे, महादेव कमळे, मळसिद्ध मुगळे सरपंच सुशीला ख्यामगोंडे उपस्थित होते.