चित्रपट पाहायला शिका -अभिनेते डॉ. मोहन आगाशे

टीम महाराष्ट्र देशा : वाचण्याइतके लिहिणे सोपे नसते, त्याप्रमाणे चित्रपट पाहण्याइतके तो तयार करणे सोपे नसते. पण आपण वाचायला शिकतो तसे चित्रपट पाहायला सुद्धा शिकले पाहिजे. चित्रपटांतील बारकावे टिपता आले पाहिजेत, तरच चित्रपट समजतो, असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी येथे व्यक्त केले.

स्वर, अभिजात फिल्म सोसायटी आणि अंतरंग व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रातर्फे येथे शनिवारपासून मानसरंग चित्रपट महोत्सव सुरू झाला. सुरूवातीला ‘कासव’ आणि ‘अस्तू’ हे चित्रपट दाखविण्यात आले. या चित्रपटांवर संवाद साधत चित्रपट कसा बघितला पाहिजे, यावर डॉ. आगाशे यांनी मुक्तचिंतन मांडले.

सर्वांच्याच आयुष्याची सुरुवात अभिनयाने होत असते. बालपण नकला करण्यातच जाते. नंतर आपण बोलायला, वाचायला, लिहायला शिकतो. मला लहानपणी वाचनातून शिक्षण घेताना अडचणी येत होत्या. त्यामुळे मी ज्यांना वाचून समजते, अशा विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलो. पुढे नाटकांकडे वळलो. नाटक करता-करता शिकत गेलो, असे सांगून डॉ. आगाशे म्हणाले, मन ही गोष्ट सर्वांत महत्त्वाची आहे. माणूस आजारी असो किंवा निरोगी, मनाशिवाय जगण्याला अर्थच नाही. मन नावाची गोष्ट शरीर वाहत असते. शरीर हे केवळ मनाचे वाहन आहे. खरेतर मन संगीतासारखे आहे. वाद्य मोडते; पण संगीत नाही, तसे मनाचे आहे.

‘कासव’ चित्रपटात कासव, तर ‘अस्तू’ चित्रपटात हत्ती हे प्रतीक का वापरले, चित्रपट संपल्यानंतरही तो मनात का घोळत राहतो, मनाशी संबंधित चित्रपट विचारप्रवर्तक कसे असतात आदी बारकावे डॉ. आगाशे यांनी उलगडून दाखवले. अनेक बाबी आपल्या जीवनात येत नाहीत, घडत नाहीत. चित्रपटाच्या माध्यमातून मात्र त्या पडद्यावर घडत असतात. म्हणून चित्रपट आवडत असतो, असे निरीक्षण त्यांनी यावेळी नोंदवले.

महत्वाच्या बातम्या 

Loading...