माणदेशी ऊसतोड कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण हाके यांची निवड

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रवक्ते लक्षमण हाके यांना आता नवीन जबाबदारी मिळाली आहे. माणदेशी ऊसतोड कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

मानदेश कामगार संघटनेमध्ये सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी १३ तालुक्यांचा समावेश होतो. या परिसरातील ऊसतोड कामगारांच्या शिखर संघटनेच्या अध्यक्षपदी रासपचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रामुख्याने जत, कवटेमहांकाळ, सांगोला, आटपाडी, मंगळवेडा भागातील अनेक मुकादम आणि ऊसतोड कामगारांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे.

या निवडीनंतर लक्ष्मण हाके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी येत्या काही दिवसात ऊसतोड कामगारांची परिषद घेणार असून त्यामध्ये ऊसतोड कामगारांच्या अनेक मागण्यांसाठी मोठे आंदोलन उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.