लातूर खंडणी प्रकरणाला वेगळे वळण;पार्टनर खंंडणीखोर कसा काय ?

लातूर: लातूरमधील खाजगी शिकवणी चालकास २५ लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी आणि मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला व एका नगरसेवकाला लागलीच अटक करण्यात आली होती.या प्रकरणाने लातूरसह राज्यभर चर्चा झाली मात्र आता या प्रकरणाला दुसरी बाजू असल्याचे सांगण्यात येत आहे. फिर्यादी प्रा. विजयसिंह परिहार आणि ज्यांच्यावर त्यांनी खंडणीचा आरोप केला ते नगरसेवक पुनीत पाटील तसेच विनोद खटके हे एकत्रच शिकवणी चालवत होते.

काही कालावधीनंतर त्यांच्यात खटके उडाल्याने परिहार यांनी स्वतंत्र शिकवणी चालु केली.मात्र त्यांच्यात आर्थिक व्यवहार बाकी होता,त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत असल्याची माहिती आहे.हा वाद मिटविण्यासाठी अनेकदा त्यांच्यात बैठका झाल्या आहेत व त्यामध्ये परिहार यांना मारहाण झाली असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान,सोशल मिडियावर मात्र कॉंग्रेसचे नगरसेवक पुनीत पाटील आणि व्ही. एस. पँथर संघटनेचे अध्यक्ष विनोद खटके यांच्या समर्थनार्थ पोस्ट फिरत आहेत व त्यांच्यासोबत परिहार यांचे फोटोही फिरताना दिसत आहेत.प्रा.परिहार यांनी एकत्र शिकवणी सुरू असताना लावलेल्या पोस्टरवर पुनीत पाटील यांचा फोटोही शुभचिंतक म्हणून लावल्याचे पोस्टरवर दिसत आहे तर त्यांच्या शिकवणीतील एका कार्यक्रमाच्या फोटोतही प्रा.परिहार,पुनीत पाटील,विनोद खटके एकत्र दिसत आहेत.शुभचिंतक काम झाल्यास खंडणीखोर झाला का?,शिकवणी सुरू असताना पार्टनर काम झाले की खंडणीखोर.. अशा आशयाच्या पोस्टही पाटील यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरत आहेत.

यामध्ये केवळ खंडणी मागितल्याचा विषय नसुन या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही.यामध्ये  पोलीस मात्र दोन्ही बाजूने तपास करत आहेत.