लातूरमध्ये भाजपकडून खा. सुनील गायकवाडांचा पत्ता कट? सुधाकरराव श्रृंगारेचे नाव चर्चेत

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.लातूर लोकसभा मतदारसंघातही प्रमुख पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी करायला सुरवात केली आहे. लातूर मतदार संघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, मात्र २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपकडून दुसऱ्यांदा उभा राहिलेले सुनील गायकवाड लाखांच्या मतधिक्याने निवडून आले. यावेळेस मात्र त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सुनील गायकवाड हे नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय मानले जातात.तसेच पक्षातील सर्वच वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध आहेत.मात्र तरीही उदगीर मोठे कंत्राटदार आणि सध्या लातूर जिल्हा परिषद सदस्य असलेले सुधाकरराव श्रृंगारे यांचे नाव चर्चेत आहे. त्यांना स्थानिक नेत्यांचा पांठिबा असल्याचेही बोलले जात आहे.

Loading...

खासदार सुनील गायकवाड हे मात्र जिल्हयातील इतर नेत्यांना नकोसे झाले आहेत.त्यामुळे गायकवाड यांना मागील काही दिवसांमध्ये पक्षातील काही कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचाही प्रयत्न झाला आहे. नुकतेच भाजपा अध्यक्ष अमित शहा लातूर दौऱ्यावर असताना लातूर शहर जिल्हाध्यक्षांनी छापलेल्या पोस्टवरून खासदार गायकवाड यांना वगळले आहे. त्यामुळे लातूरच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला रंगत आली आहे.

लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि खासदार सुनील गायकवाड यांच्यामध्ये विकासकामांच्या श्रेयवादावरून झालेला दुरावा सर्वश्रुत आहे.त्यामध्ये खासदार गायकवाडांची मधल्या काळात कॉंग्रेस आमदार अमित देशमुख यांच्याशी वाढलेली जवळीकताही काही प्रमाणात याला कारणीभूत आहे. २०१९च्या निवडणुकीसाठी पक्षाने जे १२ निकष लावले आहेत.त्या सर्व निकषांनुसार मी सुवर्णपदक विजेत्यासारख काम करीत आहे, त्यामुळे पक्षातून मला कुणी डावलू शकत नाही अशा प्रकारच्या मत खासदार गायकवाड यांनी व्यक्त करून अप्रत्यक्षरीत्या पालकमंत्री संभाजी पाटलांवर निशाणा साधला होता. या सगळ्याची परतफेड पाटील या निवडणुकीत करणार असल्याचे बोलले जात आहे.

या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारीसाठी पालकमंत्री पाटील हे सुधाकरराव श्रृंगारे यांच्याच पारड्यात वजन टाकतील असे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यासोबत मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांचाही पाठींबा सुधाकरराव श्रृंगारे यांना मिळू शकतो. लातूर भाजपचा उमेदवार कोण असेल हे आता तरी सांगता येणार नाही. लातूर लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदार संघ येतात. त्यामध्ये लातूर शहर,ग्रामीण आणि औसा या मतदारसंघात कॉंग्रेस आमदार आहेत तर बाकी तीन मतदार संघ भाजपकडे आहेत.यासर्वांमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काहीच हालचाली होताना दिसत नाहीत.

जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येही म्हणावे तसे यश मिळालेले नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचा तिढा सुटला असून ही जागा कॉंग्रेसकडेच असणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्यातरी राष्ट्रवादीत कुठल्याच हालचाली नाहीत.तसं शिवसेना भाजप युती होणार कि नाही, जर झाली तर शिवसेनेकडून उमेदवार कोण असणार हे अद्यापपर्यंत तरी स्पष्ट झालेले नाही.Loading…


Loading…

Loading...