लातूर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार, कोणता पक्ष?

टीम महाराष्ट्र देशा (प्रवीण डोके) – आगामी लोकसभेची निवडणुक काही महिन्यावर येऊन ठेपली आहे. लातूर लोकसभा मतदार संघ हा मागास वर्गासाठी आरक्षित आहे. या मतदार संघात कॉंग्रेस आणि भाजपसह इतर राजकीय पक्षांनी त्या दृष्टीने तयारी सुरू केलेली पहावयास मिळत आहे.

Loading...

मागील २०१४ लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा दारुण पराभव झालेला होता. तरी सुधा आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडे अधिकृतपणे ५२ उमेदवारांनी उमेदवारी मागितली आहे.

या मतदार संघातून १९७७ मध्ये शेकापचे भाई उद्धवराव पाटील,२००४ मध्ये भाजपच्या श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर तर २०१४ मध्ये भाजपचे सुनील गायकवाड निवडून आले होते. या तीन निवडणुकीचा अपवाद वगळता सातत्याने या मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे . माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर हे तब्बल ७ वेळा या मतरसंघातून विजयी होण्याचा विक्रम केला आहे . त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा . लातूरचा हा गड परत मिळविण्यासाठी काँग्रेसला आगामी लोकसभा हि नामी संधी असेल .आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदार संघाचा घेतलेला आढावा.

काँग्रेस
उमेदवार : जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाट, भा. ई . नगराळे ,शिवाजीराव जवळगेकर ,दत्तात्रय बनसोडे ,डॉ .कालगे
परिस्थिती : आगामी निवडणूकीच्या दृष्टीने काँग्रसने इच्छूक उमेदवारांचे अर्ज मागवलेले होते. यावेळी तब्बल ५२ इच्छूकांनी काँग्रेसची उमेदवारी मिळावी अशी मागणी केलेली होती. त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील कांही इच्छूक तर आहेतच परंतु अन्य जिल्ह्यात राहणारेही कांही जण इच्छूक आहेत. काही सेवानिवृत्त अधिकारीही इच्छूक उमेदवारांच्या लाईनीत आहेत.

जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाट यांनी लोकसभेला तिकीट मिळावे म्हणून तगडी फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे. सिरसाट यांनी आतापासूनच मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरवात केली आहे.

सिरसाट हे जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांना माजी आमदार दिलीपराव देशमुख यांच्या जवळचे समजले जातात. काँग्रेसमधील मवाळ चेहरा म्हणून त्यांच्याकंड पाहिले जाते. त्यांचे वडीलही स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे कार्यकर्ते होते. त्यामुळे सिरसाट यांच नाव काँग्रेसकडून आघाडीवर असल्याची सध्या चर्चा आहे

आमदार देशमुख हे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव असल्यामुळे ते ठरवतील तोच उमेदवार राहणार आहे. त्यामुळे हाय कमांडकडून देशमुख यांनी सुचविलेल्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे हे मात्र नक्की.

भाजप
उमेदवार : विद्यमान खासदार सुनिल गायकवाड, सुधाकर शृंगारे
परिस्थिती : २००४ मध्ये भाजपच्या श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर तर २०१४ मध्ये भाजपचे सुनील गायकवाड निवडून आले होते. सध्या विद्यमान खासदार सुनिल गायकवाड याचं पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याचे समजते आहे. गायकवाड हे सध्या मतदार संघात दौरे करत असताना दिसत आहेत. अनेक ठिकाण त्यांच्या स्थानिक निधीतून झालेल्या विकास कामांचे उद्घाटन करणे, मतदारांच्या गाठी-भेटी यावर त्यांचा भर आहे. माझी संसदेत उपस्थिती चांगली आहे. तसंच माझी कामगिरी चांगली आहे. भाजपच्या हायकमांडशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे लोकसभेचं तिकीट मलाच मिळणार असा दावाही सुनिल गायकवाड करताना दिसत आहेत.

दुसरीकडे व्यावसायिक सुधाकर शृंगारे यांनी देखील लोकसभेची तयारी चावली असल्याचे दिसत आहे. शृंगारे यांनी लातूरच्या राजकारणात चांगलाच जम बसवल्याचं दिसून येत आहे. भाजपात त्यांनी पालकमंत्री, आमदार ते पदाधिकारी असं सर्वांशी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जमवून घेतलं असल्याचे दिसत आहे.

त्यामुळे येत्या काळात भाजप कोणाला उमेदवारी देणार हा प्रश्न अजूनही अनुउत्तरीत आहे.

शिवसेना
उमेदवार : सुनिल बसपुरे
परिस्थिती : तसे पाहता शिवसेनेची या मतदार संघात फारशी ताकद दिसत नाही. तरीही शिवसेना-भाजप युती झाली नाही तर,  शिवसेनेने हि जागा स्वबळावर लढवल्यास शिवसेनेकडून लातूर महापालिकेतील माजी नगरसेवक सुनिल बसपुरे यांचं नाव सध्या चर्चेत आहे. बसपुरे यांनी तशी तयारी देखील केल्याचे समजते आहे.

काय होऊ शकत?
सध्यातरी भाजपचे विद्यमान खासदार खासदार सुनिल गायकवाड आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाट यांच्यात लोकसभेचा सामना रंगणार असल्याचे चित्र आहे.

विधानसभा मतदार संघ आणि बलाबल
लातूर लोकसभा मतदारसंघात लातूर शहर, ग्रामीण, निलंगा, अहमदपूर, उदगीर आणि औसा हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये भाजप तीन, कॉंग्रेसचे तीन असे विधानसभा आमदार बालाबल आहे.Loading…


Loading…

Loading...