लातूर : लिंगायत महासंघ भाजप-शिवसेनेच्या विरोधात

blank

लातूर : लिंगायत समाजाला भाजप सरकारने आरक्षण देण्याचे आश्वासन दिले; मात्र ते गेल्या पाच वर्षांत पूर्ण केले नाही. याचा निषेध करीत लिंगायत महासंघाने विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. एवढ नव्हे तर बैठका घेऊन भाजप-शिवसेनेच्या विरोधात प्रचार करण्याचाही निर्धार महासंघातर्फे घेण्यात आला आहे. लातूर यांचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसणार आहे.

लातूरात नऊ ऑक्टोंबरपासून लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार यांच्या नेतृत्वाखाली संपर्क बैठका घेण्यात आल्या. अशी माहिती महासंघाचे सरचिटणीस चंद्रकांत काला पाटील यांनी दिली. पाटील म्हणाले, लिंगायत समाजाला ओबीसींचे आरक्षण लागू व्हावे. वाणी नावाला असलेले आरक्षण सरसकट लिंगायत, हिंदू लिंगायत यांना लागू व्हावे, यासाठी शासनाने शुद्धिपत्रक काढावे, ही मागणी 2014 पासून भाजप सरकारकडे करण्यात येत होती. दोन-तीन वेळेस मुख्यमंत्र्यांबरोबर सह्याद्री अतिथीगृहावर बैठकाही झाल्या; पण वेळोवेळी सरकारने आश्वासने दिली. शेवटी सरकारचे पाच वर्षे संपली; पण लिंगायतांना आरक्षण मिळाले नाही.

इतकेच नव्हे, मंगळवेढा येथे 2011 मध्ये आघाडी सरकारने मंजूर केलेले महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाचे भूमिपूजनही भाजप सरकारने केले नाही. सोलापूर विद्यापीठाला सिद्धरामेश्वरांचे नाव दिले नाही. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले नाही. त्यामुळेच लातूर शहर, लातूर ग्रामीण, अहमदपूर, निलंगा, औसा, उदगीर या ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

समाजाचे मोठेसंख्याबळ

लातूर जिल्ह्यात लिंगायत वाणी समाजांची संख्या मोठी आहे. या समाजाच्या पाठिंब्यावर जिल्ह्यातील बहुतांश निवडणुकीचे गणित अवलंबून असतात. समाजाची असलेली ही नाराजी आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कशा पथ्यावर पडते. की पुन्हा भाजप-शिवसेने महायुतीचे उमेदवार या समाजाची मते आपल्याकडे ओढण्यात यशस्वी होतात.हे येणारा काळच सांगेल.

महत्वाच्या बातम्या