लातूर लोकसभा खलबते :  निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आ.अमितराव देशमुख आणि निलंगेकर यांची गुफ्तगू

टिम महाराष्ट्र देशा – (प्रा.प्रदीप मुरमे) काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तथा माजी राज्यमंञी आ.अमितराव देशमुख यांनी बुधवारी निलंग्याला येवून काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची ‘अशोक’ बंगल्यावर भेट घेवून तब्बल २ तास राजकीय गुफ्तगू केली.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आ.अमितराव देशमुख हे निलंगेकरांच्या भेटीला आले होते. सकाळी ११ वा.आलेले आ.अमितराव देशमुख जवळपास दोन तास अशोक बंगल्यावर होते. या भेटी दरम्यान डाँ.निलंगेकर, आ.अमितराव व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर या नेत्यांमध्ये बंद दरवाजा आड काही वेळ चर्चा होवून लोकसभेची खलबते झाल्याचे समजते आहे .

या भेटीत आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने साविस्तर चर्चा झाली असल्याचे समजते आहे. या चर्चेतील सर्वात महत्वाचा विषय म्हणजे लातूर लोकसभा मतदारसंघातून कोणाची उमेदवारी सक्षम राहिल याबाबत खल होवून उमेदवारी फायनल झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या मतदारसंघातून ५७ जणांनी पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारीची मागणी केली असल्यामुळे उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात टाकायची यावरुन काँग्रेसमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे.

लातूर लोकसभा मतदार संघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. १९६२ पासून या मतदारसंघातून ३ वेळा टी.डी.कांबळे, ७ वेळा शिवराज पाटील तर १ वेळा जयवंत आवळे हे काँग्रेसचे खासदार निवडून आले आहेत. २००४ मध्ये श्रीमती रुपाताई पाटील निलंगेकर व २०१४ मध्ये डॉ.सुनिल गायकवाड हे भाजपचे खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे मागील पाच दशकापासून या मतदारसंघावर साहजिकच काँग्रेसचे अधिराज्य राहिले होते. माजी मुख्यमंञी डॉ.निलंगेकर, माजी केंद्रीय मंञी शिवराज पाटील चाकूरकर व माजी मुख्यमंञी विलासराव देशमुख या ञिमूर्तीमुळे हा मतदारसंघ काँग्रेसचा अभेद्य गड राहिला आहे. दरम्यान भाजपने २००४ मध्ये श्रीमती रुपाताई पाटील निलंगेकर व २०१४ मध्ये डॉ.सुनिल गायकवाड यांच्या रुपाने हा गड सर करुन काँग्रेसला मोठा धक्का दिला. या दोनही निवडणूकीमध्ये भाजप खासदार निवडून आणण्यामध्ये सध्याचे पालकमंञी संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे मोलाचे योगदान राहिले आहे .मागील निवडणूकीत डॉसुनिल गायकवाड व दत्ताञय बनसोडे हे जरी उमेदवार असले तरी खरी लढत भाजपचे संभाजीराव पाटील निलंगेकर व काँग्रेसचे आ.अमितराव देशमुख या उभय युवा नेतृत्वात झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान या लोकसभा निवडणूकीत देखील उमेदवार कोणही असो लढत ही संभाजीराव विरुध्द अमितराव अशीच होणार आहे. परंतु यावेळच्या निवडणूकीची परिस्थिती वेगळी आहे.आगामी लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेसला ‘अच्छे दिन’ आल्याचे चिञ दिसत आहे. या निवडणूकीत मोदी लाट ओसरली असून काँग्रेस आघाडीला पोषक वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडी एकसंघपणे लढल्यास काँग्रेसला हा मतदारसंघ परत ताब्यात घेता येवू शकतो. या पार्श्वभूमीवर डॉ.निलंगेकर हे जेष्ठ नेतृत्व असून त्यांचा आशीर्वाद व मोलाची साथ लाभल्याशिवाय या मतदारसंघात परिवर्तन करणे कदापि शक्य नाही हे ओळखून अमितराव माजी मुख्यमंञी डॉ.निलंगेकर यांच्या भेटीला येवून आगामी लोकसभा निवडणूक व पक्ष संघटन याबाबत साविस्तर चर्चा केली.

लोकसभा निवडणूक हि आगामी विधानसभा निवडणूकीची रंगीत तालीम असल्याने या निवडणूकीला अनन्यसाधारण महत्व आले आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघातून अशोकराव पाटील हे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार असून प्रदेश सरचिटणीस आहेत. तर अमितराव हे राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीत देशमुख व निलंगेकर यांचीच राजकीय प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याने या निवडणूकीबाबत देशमुख व निलंगेकर यांच्याकडून जोरदार रणनिती आखली जात आहे. त्यात मोर्चेबांधणीचाच एक भाग म्हणजे निलंगेकर व देशमुख यांची भेट होय असे राजकीय जाणकारांमधून या भेटीबाबत बोलले जात आहे.