लातूर: ८ हजार रूपयांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात

लातूर: जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सरकारी कार्यालयात लाच घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील सहाय्यक अधीक्षक अभिमन्यू धोंडिबा सुरवसे वैद्यकीय देयकाच्या मंजुरीसाठी बिलाच्या ५ टक्क्यांप्रमाणे ८ हजार रूपयांची लाच घेताना ८ एप्रिल रोजी दुपारी ४.२० वाजेच्या सुमारास जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील अभिलेखा विभागात सापडला. या लाचेच्या प्रकरणामुळे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात खळबळ उडाली.

तक्रारदाराच्या आई, वडिलांच्या उपचाराचे ३ लाख १२ हजार ५६४ रूपयांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाची तांत्रिक मंजुरी करून घेतो म्हणून बिलाच्या ३ टक्केप्रमाणे शासकीय शुल्क ऑनलाईन भरावे लागेल. शासकीय शुल्का व्यतिरिक्त बिलाच्या ५ टक्केप्रमाणे लाचेची मागणी केली. प्रस्तूत तक्रार ८ एप्रिल रोजी लाचलुचपतकडे प्राप्त झाली. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची पंचासक्षम पडताळणी केली. आरोपी अभिमन्यू सुरवसे याने तक्रारदाराच्या आई, वडिलांच्या उपचाराचे ३ लाख १२ हजार ५६४ रूपयांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाची तांत्रिक मंजुरी करून घेतो म्हणून बिलाच्या ३ टक्केप्रमाणे शासकीय शुल्क ऑनलाईन भरून शासकीय शुल्का व्यतिरिक्त बिलाच्या ५ टक्केप्रमाणे लाचेची मागणी करून तडजोडीअंती ८ हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.

८ एप्रिल २०२१ रोजी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील अभिलेखा विभागात तक्रारदारांना लाचेची रक्कम घेऊन पाठविले. आरोपी सुरवसे याने ८ हजार रूपये लाचेची रक्कम दुपारी ४.२० वाजता पंचासमक्ष हाताच्या इशाऱ्याने त्याच्या कपाटात ठेवण्यास सांगून स्वीकारली. त्यामुळे त्याला रंगेहात पकडून एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याच्याविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

महत्त्वाच्या बातम्या :